H-1B व्हिसा प्रक्रियेच्या निवड प्रक्रियेत बदल करणार असल्याची घोषणा अमेरिकेनं गुरूवारी केली. यामध्ये सद्यस्थितीत सुरू असलेल्या लॉटरी सिस्टम ऐवजी वेतन आणि कौशल्याला प्राधान्य दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं. यासंदर्भातील अंतिम नियम ८ जानेवारी रोजी फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. अमेरिकेतील कामगारांच्या आर्थिक हितांचं रक्षण करणं हा यामागील उद्देश आहे. तसंच तात्पुरत्या रोजगार कार्यक्रमाद्वारे परदेशी कामगारांना उच्च कार्यक्षमतेचा फायदा होईल हेदेखील सुनिश्चित करणं हा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं. H-1B व्हिसा हा अशाप्रकारचा व्हिसा आहे जो अमेरिकन कंपन्यांना परदेशी कर्मचार्यांना विशिष्ट पदांवर ठेवण्याची परवानगी देतो. अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या या व्हिसाच्या आधारे दरवर्षी हजारो भारतीय आणि चिनी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतात. एचवन बी व्हिसाच्या नियमांमधील बदलांमुळे उच्च वेतन आणि उच्च पदांवर अर्ज करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. तसंच कंपन्यांना आपल्या आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणं आणि स्वत:ला जागतिक पातळीवर स्पर्धक म्हणून कायम ठेवण्याचा मार्गही मोठा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासंदर्भातील अंतिम नियम हे फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित झाल्यानंतर ६० दिवसांमध्ये लागू होणार आहेत. H-1B व्हिसासाठी अर्ज करण्याचा पुढील टप्पा १ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. "H-1B व्हिसा योजनेचा काही कंपन्या गैरवापर करत आहेत. ते प्रामुख्यानं सुरूवाची पदं भरणं आणि आपला खर्च कमी करण्यासाठी याचा वापर करत आहेत," अशी माहिती USCIS चे उपसंचालक (धोरणे) जोसेफ एडलो यांनी दिली.
H-1B Visa प्रक्रियेत अमेरिका करणार बदल; लॉटरी सिस्टम ऐवजी नव्या पद्धतीची होणार सुरूवात
By जयदीप दाभोळकर | Published: January 08, 2021 12:42 PM
८ जानेवारी रोजी यासंदर्भातील अंतिम निर्णय फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित होणार, ६० दिवसांमध्ये नियम होणार लागू
ठळक मुद्देH-1B साठी अर्ज करण्याचा पुढील टप्पा १ एप्रिल पासून सुरू होणारफेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित झाल्यानंतर ६० दिवसांमध्ये लागू होणार नियम