वॉशिंग्टन - पाचवर्षांपासून हक्कानी नेटवर्कच्या ताब्यात असलेल्या एका कॅनडीयन-अमेरिकन जोडप्याची नुकतीच सुटका झाली. पाकिस्तानने यामध्ये महत्वाची भूमिका बजावली असली तरी या सुटकेसंबंधी एक नवीन खुलासा झाला आहे. अमेरिकेने निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानने कारवाई केली. हक्कानी नेटवर्कच्या ताब्यात असलेल्या अमेरिकन-कॅनडीयन कुटुंबांच्या सुटकेसाठी पाकिस्तानने पावले उचलली नसती, तर अमेरिकन कमांडोंनी पाकिस्तानात घुसून कारवाई केली असती.
अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिका-यांच्या हवाल्याने अमेरिकन प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिलं आहे. तालिबानशी संबंधित असलेल्या हक्कानी नेटवर्कने 2012 मध्ये या अमेरिकन-कॅनडीयन कुटुंबाचे अपहरण केले होते. काही दिवसांपूर्वी नेव्ही सील टीम 6 कमांडो पथक पाकिस्तानातील हक्कानी नेटवर्कच्या तळावर धडक कारवाई करुन या जोडप्याची सुटका करणार होते. पण अखेरच्याक्षणी हा प्लान रद्द करण्यात आला. न्यूयॉर्क टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. या कुटुंबाच्या हालचालीवर सीआयए या अमेरिकन गुप्तचर यंत्रणेची बारीक नजर होती.
पाकिस्तानातील अमेरिकेचे राजदूत डेविड हाले यांनी पाकिस्तानने अमेरिकन नागरीकांची सुटका करावी अन्यथा अमेरिका हस्तक्षेप करेल असा निर्वाणीचा इशारा दिला. त्यानंतर लगेचच पाकिस्तानकडून पावले उचलण्यात आली. पाकिस्तानने कारवाई केली नसती तर पाकिस्तान हक्कानी नेटवर्कच्या पाठिशी असल्याचा संदेश गेला असता. हक्कानी नेटवर्कवर कारवाईसाठी अमेरिका सातत्याने पाकिस्तानवर दबाव टाकत आहे.
सीआयएच्या ड्रोन विमानाने एक महिला आणि तिची तीन मुले दहशतवादी तळावर असल्याची माहिती शोधून काढली. पाचवर्षांपूर्वी या महिलेचे अफगाणिस्तानातून अपहरण झाले होते. काही धुरकट छायाचित्रांमधून या महिलेची ओळख पटली व तिच्या सुटकेसाठी नेवी सील कमांडोचे पथक तयार करण्यात आले. हे कमांडो पाकिस्तानात घुसले असते तर, पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली असती. याच कमांडो पथकाने 2011 साली अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला कंठस्नान घातले होते. काही दिवसांपूर्वी सीआयएच्या मदतीने पाकिस्तानने एका गाडीच्या लोकेशनची माहिती मिळवली आणि नाटयमरित्या या अमेरिकन-कॅनडीयन कुटुंबाची सुटका केली.