बिजिंग/वॉशिंग्टन - तैवान आणि चीन यांच्यात युद्धसदृश परिस्थिती असतानाच अमेरिकेच्या नौदलाला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेची जलद हल्ला करण्याची क्षमता असलेली आणि अणू शक्तीवर चालणारी पाणबुडी (US submarine) दक्षिण चीन समुद्रात (South China Sea) पाण्याखाली एका अज्ञात आणि रहस्यमय गोष्टीला धडकली. अमेरिकेच्या प्रशांत महासागरातील ताफ्याने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 11 सैनिय जखमी झाले आहेत. अमेरिकन आण्विक पाणबुडी अपघातादरम्यान आंतरराष्ट्रीय सागरी सीमेत होती आणि अपघात पाण्याखाली झाला, असेही त्यांनी म्हटले आहे. (US submarine hits underwater object)
एका संक्षिप्त निवेदनात यूएस नौदलाने म्हटले आहे की, यूएसएस कनेक्टिकट आण्विक पाणबुडी अपघातानंतर स्थिर आहे. तिच्या अणू संयंत्राचे कसल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. मात्र, हा अपघात नेमका कुठे झाला? यासंदर्भात यूएस नौदलाने माहिती दिलेली नाही. परंतु USNI च्या वृत्तानुसार हा अपघात दक्षिण चीन समुद्रात झाला. यात किमान 11 सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे.
चीनच्या दादागिरीला लगाम घालण्याचा अमेरिकेचा प्रयत्न -एका संरक्षण अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आण्विक पाणबुडी आता गुआम नौदल तळावर परतत आहे. ती शनिवारपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. हा रहस्यमय अपघात अशा ठिकाणी घडला, जेथे गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर नैदलाच्या हालचाली दिसून आल्या. चीन दक्षिण चीन समुद्रात तैवान आणि इतर शेजारी देशांना खेटण्याचा प्रयत्न करत आहे. चीनच्या याच दादागिरीला लगाम घालण्यासाठी अमेरिकन नौदल सातत्याने आपले एयरक्राफ्ट कॅरिअर आणि आण्विक पाणबुड्या या भागात पाठवत आहे.