वॉशिंग्टन : भारतीय-अमेरिकी संसद सदस्य प्रमिला जयपाल यांनी अमेरिकेच्या संसदेत काश्मीरवर एक प्रस्ताव सादर करीत तेथे लावण्यात आलेले दूरसंचार निर्बंध लवकर हटविण्याची मागणी केली आहे, तसेच धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
जयपाल यांनी अनेक आठवड्यांच्या प्रयत्नांनंतर हा प्रस्ताव सादर केला असून, त्याला कंसासचे रिपब्लिकन सदस्य स्टीव्ह वाटकिस या एकमेव सदस्याचे समर्थन आहे. हा केवळ एक प्रस्ताव आहे. यावर दुसºया सभागृहात मतदान करता येत नाही आणि याचे कायद्यात रूपांतरही होत नाही.
जम्मू-काश्मिरातील संचार सेवावरील निर्बंध हटविण्याचे आणि इंटरनेट सेवा बहाल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारताने ५ आॅगस्ट रोजी काश्मिरातील कलम ३७० हटविल्यानंतर या ठिकाणी निर्बंध लागू केले आहेत. हा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांनी याचा विरोध केला होता. असे सांगण्यात येत आहे की, हा प्रस्ताव सादर न करण्यासाठी भारतीय वंशाच्या नागरिकांनी २५ हजारांपेक्षा अधिक मेल केले होते.
प्रमिला जयपाल यांनी टष्ट्वीट केले आहे की, काश्मीरबाबतचा हा प्रस्ताव मी सादर केला आहे. अमेरिका-भारत यांच्यातील विशेष संबंध मजबूत करण्याची लढाई मी लढलेले आहे. लोकांना विनाकारण ताब्यात घेणे, संचार सेवा मर्यादित करणे, या भागात जाण्यासाठी रोखणे या बाबी आमच्या द्विपक्षीय संबंधांसाठी हानिकारक आहेत. तथापि, भारताने काश्मीरबाबतचे अनेक आरोप यापूर्वीच फेटाळलेले आहेत. भारताचे म्हणणे आहे की, काश्मिरातील कलम ३७० हटविणे हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. यात कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही.