अपर्णा वेलणकर - नरेंद्र मोदी नावाच्या एक्स्ट्रिमिस्ट हिंदू नॅशनलिस्ट नेत्याला दारे बंद करणार्या अमेरिकेतली माध्यमे हा नेता भारताच्या पंतप्रधानपदी पोहोचल्यावर राजकीय अपरिहार्यतांकडे थोडे दुर्लक्ष करून नव्या आर्थिक समीकरणांची मांडणी करण्यात विशेष गुंतलेली दिसतात. स्वजनांच्या विरोधाची आणि विरोधकांच्या अडथळ्यांची पर्वा न करता आपल्याला हवे तेच घडवून आणण्याची किमया साधलेले मोदी कुचंबलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी भ्रष्ट, सुस्त प्रशासनासकट एकूणच गोंधळलेल्या व्यवस्थेवर चाबूक उगारण्याची हिंमत दाखवतील, तर जागतिक अर्थव्यवस्थेला नवी रसद मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे अमेरिकन पत्रकारांना वाटते. विश्लेषक मात्र मोदींवर एवढ्यातच विश्वास ठेवण्यास राजी नाहीत. मात्र काहीही झाले, तरी जुनी कटुता विसरून अमेरिकेने मोदींच्या सरकारशी जमवून घ्यावे, असे बहुतेकांचे मत आहे. अल्पसंख्यकांपासून जागतिक बुद्धिवाद्यांपर्यंत सर्वांच्याच मनातले संशयाचे किंतू प्रयत्नपूर्वक दूर करणे आणि ‘बदला’ची घाई झालेल्या अधीर-बेरोजगार तरुण मतदारांच्या ऊर्जेला नीट वाट करून देणे ही मोदींसमोरची तातडीची आव्हाने असल्याचे अमेरिकन माध्यमे म्हणतात. निवडणूक निकालांचे गणित केवळ राजकीय समीकरणे मांडून सोडवणे सरावाचे असलेल्या भारतीय वाचकांना अमेरिकन माध्यमांनी केलेले सामाजिक विश्लेषण अप्रुपाचे वाटू शकेल. गेली १० वर्षे आर्थिक सुधारणांच्या कढईत लोटून ज्या देशाची सुस्ती झटकली, भूक वाढवली त्या देशाच्या तळागाळातले तरुण स्तर मध्यमवर्गात सरकण्यास अधीर झालेले असताना त्यांना त्यासाठीच्या संधी न देता त्यांच्या तोंडावर अनुदानाचे तुकडे फेकण्याची घोडचूक हे काँग्रेसच्या दारुण पराभवाचे मुख्य कारण असल्याचे मत व्यक्त झाले आहे. मोदींच्या ‘भगवे’पणाला तात्पुरते दुर्लक्षित करण्याची तयारी असलेल्या पश्चिमी महासत्तांना सर्वाधिक महत्त्वाचे वाटते आहे ते भारतीय अर्थव्यवस्थेला मिळालेले भरभक्कम राजकीय बहुमत! निदान आतातरी भारतातला धोरणलकवा संपेल आणि कुचंबलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारतातून काही ‘गुड न्यूज’ येईल या आशेपोटी मोदींच्या खंबीर नेतृत्वाच्या मुळाशी असलेली एककल्ली हुकूमशाही नजरेआड करण्याची बहुतेकांची तयारी असावी असे दिसते.
हुकूमशाहीकडे दुर्लक्ष करण्यास अमेरिका राजी
By admin | Published: May 19, 2014 3:29 AM