काबुल: दहशतवादी संघटना तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता तिथले नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. लाखो लोकांना अफगाणिस्तान सोडायचा आहे. राजधानी काबुलमधील विमानतळावर मोठी गर्दी आहे. अमेरिकन विमानाला लटकून प्रवास करणाऱ्या अफगाणी नागरिकांचा व्हिडीओ नुकताच समोर आला. विमान आकाशातून जात असताना काही जण खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. यानंतर आता याच विमानाच्या आतला फोटो समोर आला आहे.
काबुल विमानतळावरून उड्डाण केलेल्या अमेरिकच्या विमानाची क्षमता १३४ प्रवाशांची होती. मात्र त्यात प्रत्यक्षात ८०० जण होते. अमेरिकन हवाई दलाच्या सी-१७ ग्लोबमास्टर विमानाचे फोटो आणि व्हिडीओ कालच सर्वांनी पाहिले. विमान धावपट्टीवरून निघत असताना शेकडो लोक त्याच्या आसपास धावत होते. विमानाला लटकून प्रवास करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. याच प्रयत्नात काही जणांना जीव गेला. आता याच विमानाच्या आतल्या भागातील फोटो प्रसिद्ध झाले आहेत.
डिफेन्स वनला एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, विमानाचा दरवाजा उघडताच अफगाणिस्तान सोडण्याच्या प्रयत्नात असलेले शेकडो लोक आत शिरले. ग्लोबमास्टर विमानाची प्रवासी क्षमता फार जास्त नाही. मात्र तरीही विमानातील अमेरिकन हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांनी या सर्व अफगाणी नागरिकांना सोबत घेऊन उड्डाण करण्याचा निर्णय घेतला. यातील एका कर्मचाऱ्याचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. त्यानुसार विमानात ८०० जण होते. तर अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, विमानातील प्रवासी संख्या ६५० होती.