घटना आहे अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील. जिथे एक आठवड्यापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने १७ वर्षीय मुलीला गोळी झाडली. काही वेळाने तिचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ शुक्रवारी जाहीर करण्यात आला. ज्यात अधिकारी मुलीवर बंदूक ताणून असल्याचं दिसत आहे. फुलर्टन पोलीस विभागाने मुलीच्या परिवाराने उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर हा ग्राफिक व्हिडीओ जारी केलाय. यात ५ जुलै रोजी गोळी लागल्यानंतर १७ वर्षीय हन्ना विलियम्स जखमी स्थितीत मदत मागताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तिच्याकडे नकली बंदूकही पडलेली दिसते.
पोलिसांनी एक ऑडिओ जारी केली आहे. ज्यात मुलीचे वडील बेंसन विलियम्स तिच्या बेपत्ता होण्याबाबत सांगताना ऐकायला मिळतात. मुलगी बेपत्ता होण्याच्या ९० मिनिटांनंतरच ही तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्यानुसार, ते फार घाबरलेले होते. त्यांना भीती होती की, त्यांची मुलगी स्वत:ला काही करून घेईल. कारण ती डिप्रेशनच्या जाळ्यात होती.
पोलिसांनुसार, मुलीला गोळी मारणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, ती फार वेगाने गाडी चालवत होती. ती तिच्या कुत्र्याला घेऊन हॉस्पिटलला जात होती. पण आम्ही जेव्हा तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तर तिने नकार दिला. नंतर यू-टर्न घेऊन तिने गाडी वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. ती चुकीच्या रस्त्याने गेली.
जेव्हा आम्ही तिला रोखण्यात यशस्वी झालो, तेव्हा तिने आमच्यावर बंदूक ताणली. याकारणाने आम्हाला तिच्यावर गोळी झाडावी लागली. मात्र नंतर लक्षात आलं की, तिच्याकडे असलेली बंदूक नकली होती. व्हिडीओ फुटेजमध्ये दिसत आहे की, अधिकारी ड्रायव्हर सीटकडे वळला, तेव्हा ती गाडीतून बाहेर आली आणि तिने अधिकाऱ्यावर बंदुक ताणली. पण आता तिच्या परिवाराने या केसवर स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.