नवी दिल्ली: जागतिक कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे. फोनवरील संभाषणादरम्यान ट्रम्प यांनी मोदींना जी-७ राष्ट्रांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी विशेष निमंत्रण दिलं. भारत जी-७ चा भाग नाही. मात्र ट्रम्प यांनी भारताचा समावेश जी-७मध्ये करण्याची इच्छा मोदींकडे व्यक्त केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या निमंत्रणावर मोदींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कोरोनानंतरच्या काळात अशा मजबूत संघटनेची आवश्यकता असल्याचं मोदी म्हणाले. जी-७ परिषदेत अमेरिका आणि इतर देशांसोबत काम करणं भारतासाठी निश्चितच आनंदाची बाब असेल, असं मोदींनी म्हटलं. यावेळी पंतप्रधानांनी अमेरिकेत सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली. परिस्थिती लवकरत सुधारेल, अशी आशाही मोदींनी व्यक्त केली. जॉर्ज फ्लॉयर्ड नावाच्या एका कृष्णवर्यीय व्यक्तीचा पोलिसी अत्याचारात मृत्यू झाल्याचा आरोप असून त्याविरोधात अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये सध्या आंदोलनं सुरू आहेत.