वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. मोदी सज्जन व्यक्ती असून, माझे चांगले मित्र आहेत. गुजरातमधील अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमाबाबतही त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती व्हाइट हाऊसनं दिली होती. मोदींनी सांगितलं होतं की, विमानतळापासून अहमदाबादच्या न्यू स्टेडियम(मोटेरा स्टेडियम)पर्यंत आमच्याकडे लाखो लोक तुमचं स्वागत करणार आहेत. अमेरिका आणि भारताची सामरिक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी ट्रम्प हा दौरा करत आहेत. तसेच भारतीय लोकांशी मजबूत आणि चांगले संबंध प्रस्थापित करण्याचाही या दौऱ्याचा उद्देश आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये व्यापारी आणि संरक्षण कराराला अंतिम स्वरूप दिली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प दोन दिवसांच्या दौऱ्यापूर्वीच अमेरिकेची संरक्षण संस्था लॉकहीड मार्टिनकडून 2.6 अब्ज डॉलर्समध्ये 24 एमएच -60 आर सीहॉक हेलिकॉप्टर खरेदीस मान्यता देण्याच्या विचारात आहे.
मोदी सज्जन, भारतात येण्यास उत्सुक, डोनाल्ड ट्रम्प यांची स्तुतिसुमनं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 10:55 AM