वॉशिंग्टन - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमधील तणावात आणखी भर पडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील संबंध आता धोकादायक स्थितीत असल्याचं म्हटलं आहे. तसेच भारताने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान गमावले आहे आणि भारत पाकिस्तानविरोधात खूप कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत, त्यांची मनस्थिती मी समजू शकतो, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे.
'पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजवरची सर्वात तणावाची परिस्थिती आहे. हा तणाव कमी व्हावा यासाठी आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. भारतीयांच्या भावना आम्ही समजू शकतो. दोन्ही देशांमधील तणाव कमी व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. आमची चर्चा सुरू आहे. चर्चा प्रक्रियेत अनेकांचा सहभाग आहे. चर्चेत समतोल साधणं हे आव्हान आहे' असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानला अमेरिकेकडून 1.3 अब्ज डॉलरची आर्थिक मदत दिली जायची. ती मदत आम्ही थांबवली आहे. आम्ही पाकिस्तानसोबत काही बैठका घेणार असून अमेरिकेच्या यापूर्वीच्या राष्ट्रपतींच्या काळात पाकिस्तानला खूप झाला. पण पाकिस्तान अपेक्षित मदत करत नसल्याने मी मदत थांबवली, असे ट्रम्प यांनी सांगितले.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझीचा खात्मा केल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे. दहशतवाद्यांनी एकतर हत्यारं सोडून समर्पण करावं किंवा मग मरणास सामोरं जाण्यास तयार राहावे, असा स्पष्ट इशाराच भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत दिला आहे. ''दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदवर पाकिस्तानी सैन्य आणि ISIचा वरदहस्त आहे. जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानी सैन्याचंच अपत्य आहे'',असा थेट निशाणाच भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केला आहे. तसंच आगामी काळातही दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र स्वरुपात राबवली जाईल आणि काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा केला जाईल. त्यांना जिवंत सोडलं जाणार नाही', असेही भारतीय लष्कराने ठणकावून सांगितले आहे.