न्यूयॉर्क : अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठ चिनी सॉफ्टवेअरची देवाण-घेवाणीवर प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अलीबाबा अँट ग्रुपचा समावेश आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या आठ सॉफ्टवेअरवर प्रतिबंध घालण्याऱ्या एका कार्यकारी आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. यामध्ये व्हिचॅटपे, अलीबाबा अँट ग्रुपचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेत नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी चीनशी असलेला तणाव वाढला आहे, अशी कबुली एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यावेळी बोलताना दिली.
काही महिन्यांपूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही चिनी अॅपवर बंदी घातली होती. तसेच ऑगस्ट २०२० मध्ये टिकटॉक आणि व्हिचॅट यांसारख्या अॅपवर प्रतिबंध घालण्याचा आदेश काढण्यात आला होता. एवढेच नव्हे, तर अमेरिकी कर्मचाऱ्यांनीही टिकटॉकचा वापर करू नये, असा ठराव अमेरिकन सीनेटने एकमताने पारित केला होता. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव चिनी अॅपवर बंदी घालत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावेळी सांगितले होते.