बेलारित्झ - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. याच दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जी 7 संमेलनात भेट होणार आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी काश्मीर प्रकरणावरून भारत आणि पाक यांच्यात मध्यस्थी करु शकतो असं सांगितले होते. मात्र भारताने हा दोन देशांमधील प्रश्न आहे असं सांगत ट्रम्प यांची मध्यस्थी करण्याची भूमिका फेटाळून लावली.
आज बेलारित्झ येथे होणाऱ्या जी 7 संमेलनात नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात भेट होणार असल्याची माहिती आहे. यात ट्रम्प यांच्याकडून काश्मीरचा मुद्दा आला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांना काश्मीरमधील सध्याची परिस्थिती आणि सरकारकडून उचलणारे पाऊल याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प सुद्धा चीनसोबत अमेरिकेचं चाललेलं ट्रेड वॉर याची माहिती देणार असल्याचं सूत्रांनी सांगितले.
काश्मीरवर चर्चा झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पष्टपणे जम्मू आणि काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन झालं नसल्याचं सांगणार आहेत. या भेटीत भारत अमेरिका यांच्यातील व्यापाराबाबतही चर्चा होईल. चीन आणि अमेरिका यांच्यातील ट्रेड वॉरमुळे जगातील अन्य देशांना मंदीचा फटका बसू लागला आहे. यावरही चर्चा केली जाणार आहे.
इकोनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार बहुतांश अमेरिका कंपन्या या ट्रेड वॉरमुळे आपलं बस्तान चीनऐवजी भारतात शिफ्ट करण्याची योजना बनवित आहेत. जवळपास 250 पेक्षा अधिक कंपन्या भारतात येण्यासाठी इच्छुक आहेत. अमेरिकेच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीतून खूप अपेक्षा आहे. या भेटीत रणनीती, भागीदारी, दहशतवाद आणि व्यापार याबाबत चर्चा होणार आहे. भारताची बाजारपेठ अमेरिका कंपन्यांसाठी खुली करावी असं अमेरिकेला वाटतं.
तसेच भारत-पाकिस्तान यांच्यातील मुद्दा या बैठकीत येईल. जम्मू काश्मीरमधील तणाव कमी करण्यासाठी आणि काश्मीरात मानवाधिकाराचा सन्मान राखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आग्रही आहेत असं अमेरिकेच्या सूत्रांचे म्हणणं आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.