US Presidential Election 2024: भारतीय वंशाच्या निक्की हेली यांनी अमेरिकेत पुढील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प सरकारच्या काळात दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर आणि संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत राहिलेल्या निक्की हेली यांनी 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी आपली मोहीम सुरू केली आहे. यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर त्यांच्याच पक्षातील महिलेचे आव्हान असणार आहे.
दोन वर्षांपूर्वी निक्की हेलीने 2024 च्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. निक्कीने मध्ये माजी बॉस डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण, आता निक्की हेलींनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे निवडणुकीसाठी आपला दावा मांडला आहे. 51 वर्षीय निक्की हेली या दोनदा दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर राहिल्या आहेत. 2024 च्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दावा सादर करणारे ट्रम्प हे एकमेव नेते होते, मात्र आता निक्की हेलीच्या निर्णयानंतर ट्रम्पसमोर मोठे आव्हान असणार आहे.
व्हिडिओ मेसेजमध्ये काय म्हणाल्या?“मी निक्की हेली, मी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहे. नवीन पिढीने नेतृत्व करण्यासाठी पुढे यण्याची वेळ आली आहे. चीन आणि रशिया पुढे जात आहेत. आपल्याला धमकावले जाऊ शकते, लाथ मारली जाऊ शकते, असे त्यांना वाटते. पण मी त्यांना घाबरत नाही. मी निक्की हेली आहे आणि मी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहे.'' असे त्यांनी व्हिडिओत म्हटले.
निक्की हेलीचा प्रवासनिक्की हेलीचा जन्म शीख पालक अजित सिंग रंधवा आणि राज कौर रंधावा यांच्या पोटी झाला. रंधावा कुटुंब 1960 च्या दशकात पंजाबमधून कॅनडा आणि नंतर अमेरिकेत स्थलांतरित झाले. हेलीचे वडील पंजाब कृषी विद्यापीठात प्राध्यापक होते आणि तिच्या आईने दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. वयाच्या 39 व्या वर्षी हेली अमेरिकेतील सर्वात तरुण गव्हर्नर बनल्या. जानेवारी 2011 मध्ये पदभार स्वीकारला आणि दक्षिण कॅरोलिनाच्या पहिल्या महिला गव्हर्नर म्हणून इतिहास रचला. त्या राज्याच्या पहिल्या भारतीय अमेरिकन गव्हर्नर देखील होत्या. जानेवारी 2017 ते डिसेंबर 2018 पर्यंत, त्यांनी संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे 29 वे राजदूत म्हणून काम केले.