US Presidential Election : अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जशी जवळ येत चालली आहे तसे सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांना लक्ष्य केलं जात आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांना डेमोक्रॅट पक्षाकडून अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली. अशातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिसच्या वांशिक ओळखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बुधवारी एका मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांनी कमला हॅरिस खरंच कृष्णवर्णीय आहेत का, की राजकीय सोय म्हणून त्या या ओळखीचा वापरत आहेत का, असा सवाल केला.
नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लॅक जर्नलिस्टच्या वार्षिक परिषदेत ट्रम्प यांनी कमला हॅरिसच्या वांशिक ओळखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुमारे १,००० लोकांसमोर बोलत असताना ट्रम्प यांनी हा सवाल केला. "कमला हॅरिस या नेहमीच भारतीय वंशाच्या होत्या आणि त्या फक्त भारतीय वंशाचा प्रचार करत होत्या," असं ट्रम्प यांनी म्हटलं.
"कमला हॅरिस भारतीय आहे की कृष्णवर्णीय आहेत हे मला माहीत नाही? पण तुम्हाला माहीत आहे की मी दोघांचाही आदर करतो. पण त्या स्पष्टपणे असं मानत नाही. त्या सुरुवातीपासूनच भारतीय होत्या. अचानक त्यांनी वेगळे वळण घेतले आणि त्या कृष्णवर्णीय बनल्या," असे ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या वक्तव्याला आता मोठ्याप्रमाणात विरोध होत आहे.
यासोबत एक मुलाखतीदरम्यान, ट्रम्प यांना जातीय आक्षेपार्ह टिप्पण्यांसह त्यांचा वादग्रस्त इतिहास असूनही कृष्णवर्णीय मतदारांनी त्यांचे समर्थन का करावे, असा सवाल केला होता. यावर बोलताना अब्राहम लिंकन यांच्यानंतर कृष्णवर्णीय लोकांसाठी मी सर्वोत्तम अध्यक्ष आहे, असे ट्रम्प म्हणाले.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या वतीने व्हाईट हाऊसने ट्रम्प यांच्या टिप्पण्यांना ताबडतोब प्रत्युत्तर देत हे लज्जास्पद असल्याचे म्हटलं आहे. हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियरे यांनी ट्रम्प यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. "त्यांनी नुकतेच जे सांगितले ते घृणास्पद आहे. ते अपमानजनक आहे," पियरे म्हणाल्या.
दरम्यान, निवडणुकीचा प्रचार सुरू करताना ट्रम्प यांच्या पक्षाने कमला हॅरिस यांना देशासाठी धोकादायक नेत्या म्हणत जाहिराती केल्या आहेत. कमला हॅरिस या धोकादायकपणे उदारमतवादी असून हे देशासाठी अजिबात चांगले नाही, असा आरोप ट्रम्प यांच्या पक्षाने केला आहे. अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर बेकायदेशीर स्थलांतरितांचे आक्रमण रोखण्यात हॅरिस अपयशी ठरल्याचा आरोप जाहिरातीत करण्यात आला आहे.