ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ७ - डेमोक्रॅटिक पक्षाकडून अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळाचा आकडा हिलरी क्लिंटन यांनी गाठला आहे. असोसिएटेड प्रेसने ही माहिती दिली. डेमोक्रॅटिक पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक लढवणा-या त्या पहिल्या महिला ठरणार आहेत.
आठवडयाच्या अखेरीस प्युरटो रिको प्रायमरीमध्ये विजय मिळवल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी २,३८३ प्रतिनिधींचे समर्थन आवश्यक होते. हिलरी क्लिंटन यांनी हा पाठिंबा मिळवला आहे. जुलै महिन्यात फिलाडेलफीया येथे डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिवेशन होणार आहे.
तिथे रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात हिलरीच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली जाईल. आठ नोव्हेंबरला अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. हिलरी यांची निवड निश्चित असताना यासंबंधी बोलताना त्या म्हणाल्या की, मी त्या ऐतिहासिक क्षणाच्या अत्यंत निकट आहे. मंगळवारी सहा राज्यांमध्ये मतदान होणार आहे तिथे अजून भरपूर काम करायचे आहे.
To everyone who's worked so hard, thank you. Let's go win this thing. pic.twitter.com/T6ou2Znh9D— Hillary Clinton (@HillaryClinton) June 7, 2016
हिलरी सध्या कॅलिफोर्नियामध्ये प्रचार करत आहेत. प्रत्येक मत माझ्यासाठी महत्वाचे असून ते मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेन असे हिलरी यांनी सांगितले. हिलरी यांना व्हाईट हाऊसचा अनुभव आहे. त्यांचे पती बिल क्लिंटन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत.
हिलरी यांना प्रशासनाचा चांगला अनुभव असून, ओबामा प्रशासनात त्यांनी परराष्ट्र व्यवहार सारखे महत्वाचे खाते संभाळले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजय-पराभवानुसार जागतिक राजकारणातील समीकरणे बदलतात. त्यामुळे संपूर्ण जगाचे उमेदवाराच्या निवडीवर लक्ष असते.