- नितीन रोंघे(अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे अभ्यासक)
साऱ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. ५ नोव्हेंबरला ही महत्त्वाची निवडणूक होणार असून पुढील दोन आठवड्यांत उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अध्यक्षीय पदासाठी चुरस होणार आहे. २०२० साली पराभूत झालेले ट्रम्प या निवडणुकीत पुन्हा आपले नशीब आजमावत आहेत. जून महिन्यात झालेल्या पहिल्या अध्यक्षीय चर्चेत त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांना कोंडीत पकडले आणि बायडेन यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. माघार घेताना जो बायडेन यांनी कमला हॅरिस यांचे नाव पुढे केले. त्यांनी गेल्या तीन महिन्यांत प्रचारात चांगली आघाडी घेतली आहे.
लोकांना डोनाल्ड ट्रम्प व्यक्ती म्हणून फारसे आवडत नाहीत, परंतु त्यांच्या धोरणांचा आदर आहे. दुसरीकडे, लोकांना कमला हॅरिस व्यक्ती म्हणून आवडतात, पण त्यांच्या धोरणांबाबत संभ्रम आहे. राष्ट्राध्यक्ष असताना ट्रम्प हे एकमेव नेते होते, ज्यांनी आपल्या धोरणांची अंमलबजावणी प्रत्यक्षात केली. तर, कमला हॅरिस या अमेरिकन निवडणुकीच्या हिशोबाने एक “कम्प्लीट पॅकेज” मानल्या जातात. त्यांच्या आई भारतीय, आशियाई वडील आफ्रिकन-अमेरिकन आणि पती ज्यू आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्या ५४ इलेक्टोरल मतं असलेल्या कॅलिफोर्निया राज्यातून येतात.
अमेरिकेत वरील तीन समुदायांची मते महत्त्वाची ठरतात. अध्यक्ष होण्यासाठी उमेदवाराला ५३८ पैकी २७० इलेक्टोरल मतं मिळवावी लागतात. इलेक्टोरल मतं ही राज्यांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाटली जातात. या निवडणुकीत अमेरिकन अर्थव्यवस्था, महिलांचे आरोग्य हक्क आणि मध्यपूर्वेतील संघर्ष हे मतदारांवर परिणाम करणारे महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत. मात्र, केवळ दोन आठवडे शिल्लक असल्याने आता दोन्ही उमेदवार एकमेकांच्या तुल्यबळ वाटत असून, ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असे चित्र आहे.
सध्या निवडणूक “स्विंग स्टेट्स”मध्ये केंद्रित झाली आहे. शेवटच्या क्षणी कुठल्याही पक्षाकडे झुकणाऱ्या राज्यांना अमेरिकेत “स्विंग स्टेट्स” म्हणतात. यंदा पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, मिशिगन, ऍरिझोना, विस्कॉनसिन आणि नेवाडा या ७ राज्यांवर सर्वांचे लक्ष आहे. मतदारसंख्या पाहता आणि अमेरिकन निवडणुकीच्या मूडचा विचार करता, यंदाच्या निवडणुकीत पेनसिल्व्हेनिया राज्य निर्णायक ठरेल, असे वाटते.
पहिल्या सोमवारनंतरचा मंगळवार... असेच का?अमेरिका ही जगातील सर्वात जुनी आणि तावून सुलाखून निघालेली लोकशाही आहे. अमेरिकेत निवडणुका नेहमी नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतरच्या मंगळवारी घेतल्या जातात. यामागे एक मोठा तर्क आहे.१७८८ ते १८४५ पर्यंत निवडणुका विविध तारखांना घेतल्या जायच्या. मात्र, १८४५ मध्ये एका कायद्याने संपूर्ण देशासाठी एकच निवडणुकीचा दिवस निश्चित केला गेला - नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतरचा मंगळवार.पूर्वी अमेरिका कृषिप्रधान समाज होता. ऑक्टोबरच्या शेवटी शेतातील पिकं काढली जात आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडी कमी असायची, त्यामुळे त्यावेळी निवडणुका घेतल्या जाव्यात, असे ठरले. मात्र, नेमका दिवस निवडण्यासाठी काही तर्क लावले गेले.रविवार आणि बुधवार हे दिवस टाळण्यात आले, कारण रविवार हा लोकांचा चर्च उपासना व विश्रांतीचा दिवस आणि बुधवार हा बाजाराचा दिवस असे. सोमवारी निवडणूक ठेवल्यास मतदान केंद्र दूर असल्यास रविवारी प्रवास करावा लागला असता. शिवाय, १ नोव्हेंबर हा “ऑल सेंट्स डे” असल्यामुळे आणि व्यापाऱ्यांना महिन्याच्या पहिल्या दिवशी खाती पूर्ण करायची असल्यामुळे तो दिवसही टाळण्यात आला. त्यामुळे मंगळवार निवडला गेला.त्याकाळी मंगळवार सोयीचा दिवस मानला गेला असला तरी आज तो अडचणीचा वाटतो. मतदानाचा दर कमी होत चालल्यामुळे काही लोकांनी निवडणुका शनिवार-रविवारी घ्याव्यात, अशी सूचना केली आहे.