वॉशिंग्टन - अमेरिकेच्या उच्चाधिकारी नॅन्सी पेलोसी यांच्या तैनाव दौऱ्यानंतर चीनकडून अमेरिकेला वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. मात्र या धमक्यांना केराची टोपली दाखवत अमेरिकेने चीनला पुन्हा एकदा डिवचले आहे. पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर १२ दिवसांनी आता अमेरिकेच्या खासदारांचं एक शिष्टमंडळ तायपेच्या दौऱ्यावर गेले आहे. याआधी पेलोसी यांच्या तैवान यात्रेबाबत चीनने विरोध नोंदवला आहे. चीन दीर्घकाळापासून तैवानला आपला अविभाज्य भाग समजत आला आहे. तसेच चीनच्या या भूमिकेला अमेरिकेकडून विरोध आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या ५ खासदारांचं एक शिष्टमंडळ तैवानमध्ये पोहोचले आहे. त्याचं नेतृत्व मॅसाचुसेट्सचे डेमोक्रॉटिक खासदार एड मार्के करत आहेत. या शिष्टमंडळामध्ये ओमुआ अमाता कोलमेन राडेवेगन, जॉन गारमेंडी, एलन लोवेंथल आणि डॉन बेअर यांचा समावेश आहे. अमेरिकन सरकारचं विमान संध्याकाळी सुमारे ७ वाजता शिष्टमंडळातील सदस्यांना घेऊन तैवानच्या राजधानीमध्ये उतरले.
हे शिष्टमंडळ तैवानमध्ये रविवार आणि सोमवारी तैवानमध्ये राहणार असल्याची माहिती अमेरिकेकडून देण्यात आली आहे. या शिष्टमंडळातील सदस्य अमेरिका-तैवान संबंध, क्षेत्रिय सुधारणा, व्यापार, गुंतवणूक आणि इतर अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तेथील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील. पेलोसी यांच्या दौऱ्याचा विरोध करताना चीनने ही बाब त्याच्या सार्वभौमत्वाविरोधात असल्याचा दावा केला होता. तसेच तैवानविरोधात आक्रमक भूमिका घेत तैवानच्या सागरी आणि हवाई हद्दीत क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.