वॉशिंग्टन/कीव्ह: युक्रेन-रशिया यांच्यात युद्ध सुरू होऊन दोन आठवडे होत आले आहेत. पण अद्याप तरी युद्ध संपवण्याबाबत कोणत्याही सकारात्मक घडामोडी घडताना दिसत नाहीत. युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनचं सैन्य बलाढ्य रशियन फौजेचा सामना करत आहे. युरोपियन देश आणि अमेरिकेनं युक्रेनला लष्करी मदत दिली. शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला. मात्र कोणत्याही देशानं युक्रेनच्या मदतीला सैन्य पाठवलं नाही.
आता अमेरिकेनं युक्रेनला मोठा झटका दिला आहे. पोलंडनं युक्रेनला त्यांच्याकडे असणारी २८ मिग-२९ विमानं देऊ केली होती. आमच्या विमानं जर्मनीतील तुमच्या हवाई तळावर तैनात करा, असा प्रस्ताव पोलंडनं अमेरिकेला दिला होता. मात्र अमेरिकेनं हा प्रस्ताव फेटाळून लावला. रशियन सैन्यानं युक्रेनची राजधानी कीव्हला वेढा दिला असताना अमेरिकेनं घेतलेल्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
रशियन सैन्याचा सामना करण्यासाठी लढाऊ विमानं द्या, असं आवाहन रशियाचे अध्यक्ष जेलेन्स्की यांनी केलं होतं. त्यानंतर पोलंडनं युक्रेनच्या मदतीला रशियात तयार झालेली २८ मिग-२९ विमानं पाठवण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी पोलंडनं अमेरिकेला प्रस्ताव दिला. मात्र आम्ही हा प्रस्ताव स्वीकारण्यास असमर्थ असल्याचं पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितलं. आमची विमानं अमेरिकेच्या रामस्टेन हवाई तळावर पाठवतो. तिथून ती युक्रेनच्या मदतीला पाठवा, असा प्रस्ताव पोलंडनं दिला होता.
पोलंडची विमानं जर्मनीमधून युक्रेनच्या मदतीला पाठवल्यास त्यामुळे संपूर्ण नाटोला धोका निर्माण होईल, असं किर्बी म्हणाले. रशियन लढाऊ विमानं सध्या युक्रेनच्या आकाशात घिरट्या घालत बॉम्बवर्षाव करत आहेत. आम्ही या संदर्भात पोलंड आणि नाटोतील अन्य सदस्यांशी सल्लामसलत करत राहू, असं किर्बी यांनी सांगितलं. पोलंडनं पाठवलेला प्रस्ताव अमेरिकेनं फेटाळल्यानं युक्रेनला धक्का बसला आहे.