भारताला ज्ञान शिकवणाऱ्या अमेरिकेचा दुटप्पीपणा; रशियाकडून खरेदी केले तेल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 05:23 PM2024-01-12T17:23:56+5:302024-01-12T17:24:51+5:30
Russia Oil Import By US: अमेरिकेने रशियाकडून दोन महिन्यात सुमारे 46 हजार बॅरल तेल आयात केले.
Russia US News: गेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले. अमेरिकेने तर भारतालाही रशियाकडून कच्चे तेल खरेदी न करण्याचा सल्ला दिला होता. पण, आता अमेरिकेनेच पुन्हा रशियाकडून तेल आयात करण्यास सुरुवात केली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अमेरिकेने रशियाकडून सुमारे 46 हजार बॅरल तेल आयात केले.
2022 मध्ये अमेरिकेने रशियन तेल, वायू आणि इतर ऊर्जा स्रोतांच्या आयातीवर बंदी घातली होती. विविध मीडिया रिपोर्ट्समध्ये अमेरिकेच्या एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन (EIA) च्या डेटाचा हवाला देण्यात आला आहे. EIA डेटा दर्शवितो की अमेरिकेने प्रत्येक बॅरल तेलासाठी रशियाला प्रीमियम भरला आहे. अमेरिकेचे हे पाऊल स्वतःच्याच बंदीविरोधात आहे.
विशेष म्हणजे, मार्च 2022 मध्ये अमेरिकेने रशियन तेल, वायू आणि इतर ऊर्जा स्रोतांच्या आयातीवर बंदी घातली होती. पण, आता अमेरिकेने पुन्हा रशियाकडून तेल आयात करण्यास सुरुवात केली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, रशियाकडून तेल आयात करण्यासाठी अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाच्या फॉरेन अॅसेट्स कंट्रोल (OFAC) कार्यालयाकडून विशेष परवाना जारी करण्यात आला आहे.
निर्बंधांना न जुमानता अमेरिकेने रशियन तेलाची आयात केल्याने त्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो. गेल्या वर्षी युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर अनेक पाश्चिमात्य देशांनी भारतावर रशियाकडून तेल केल्यामुळे टीका केली होती, भारताला नैतिकतेचे सल्ले दिले जात होते. पण, आता अमेरिकेनेच रशियाकडून महाग तेल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
EIA डेटानुसार, अमेरिकेने ऑक्टोबरमध्ये प्रति बॅरल $74 आणि नोव्हेंबरमध्ये $76 प्रति बॅरल दराने तेल खरेदी केले. ही किंमत 2022 मध्ये यूएस आणि त्याच्या सहयोगींनी सेट केलेल्या $60 च्या किंमतीपेक्षा खूप जास्त आहे. रशियाकडून तेल आयात पुन्हा सुरू करण्याचे कोणतेही कारण अमेरिकेने दिले नाही. मात्र, जागतिक ऊर्जा संकट, चीनसोबतचा तणाव आणि युक्रेनचा मुद्दा यामुळे अमेरिकेला असा निर्णय घ्यावा लागला असावा, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.