mitch mcconnell, angela chao, tesla car: यूएस सिनेट रिपब्लिकन नेते मिच मॅककोनेल यांच्या मेहुणीचा तलावात बुडून मृत्यू झाला होता. अँजेला चाओ असे त्यांचे नाव असून त्या ५० वर्षांच्या होत्या. शिपिंग फर्म फॉरमोस्ट ग्रुपच्या त्या सीईओपदी कार्यरत होत्या. अमेरिकेच्या दक्षिणेकडील टेक्सास राज्यातील एका तलावात त्या आपल्या टेस्ला कारसह पडल्या आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना फेब्रुवारी 2024 मध्ये घडली होती, ज्याबाबत या महिन्यात काही खुलासे झाले आहेत.
मृत्यूबाबत नवा महत्त्वाचा खुलासा
एका माहितीनुसार, वीकेंडला अँजेलाचा नवरा आणि अमेरिकन व्हेंचर कॅपिटलिस्ट जिम ब्रेयर कामात व्यस्त असताना, ती तिच्या मित्रांसोबत चायनीज न्यू इयर साजरे करत होती. तेथून परतत असताना एका ठिकाणी तिला तीन वळणे दिसली आणि त्यानंतर कार ड्रायव्हिंग मोडमध्ये ठेवण्याऐवजी तिने रिव्हर्स मोडमध्ये ठेवली. रिव्हर्स मोड चालू करताच कार मागील बाजूला जाऊन तलावात पडली.
२४ मिनिटांनी बचाव पथक दाखल
जेव्हा कार तलावात बुडू लागली तेव्हा अँजेलाने तिच्या मित्राला फोन करून मदतीसाठी बोलावले. माहिती मिळताच मित्र घटनास्थळी पोहोचला. त्याने बचाव प्राधिकरणाला माहिती दिली आणि ते येण्यापूर्वी त्याने अँजेलाला वाचवण्यासाठी तलावात उडी मारली. त्याने सांगितले की, टेस्लाच्या कारची काच इतकी मजबूत होती की खूप प्रयत्न करूनही ती तोडण्यात अपयश आले. या घटनेच्या वृत्तात सांगण्यात आले की, बचाव अधिकारी माहिती मिळाल्यानंतर २४ मिनिटांनी घटनास्थळी पोहोचले.
४३ मिनिटांनी अँजेलाला मृत घोषित केले
अँजेलाला वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. कार पूर्णपणे पाण्यात बुडाल्याने टो ट्रकची मदत घेण्यात आली, मात्र ट्रकची केबल तुटल्यामुळे ती गाडीपर्यंत पोहोचू शकली नाही. काही रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की ट्रकच्या चालकाला विजेचा धक्का बसण्याची भीती होती. खूप प्रयत्नांनंतर, कार बाहेर काढण्यात आली, त्यानंतर तिचा दरवाजा कसाबसा उघडला. अँजेला कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देत नव्हती. अखेर ४३ मिनिटांच्या प्रयत्नानंतर तिला मृत घोषित करण्यात आले.