न्यूयॉर्क - कोरोना व्हायरसपुढे हतबल झालेल्या अमेरिकेतून आता डब्ल्यूएचओविरोधात सूर यायला सुरुवात झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता रिपब्लिकन खासदार रिक स्कॉट यांनीही जागतीक आरोग्य संघटनेच्या (WHO) भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच डब्ल्यूएचओला दिल्या जाणाऱ्या फंडात कपात करण्याची मागणी केली आहे. अमेरिका सुरुवातीपासूनच चीन आणि डब्ल्यूएचओवर व्हायरसशी संबंधित माहिती लपवत असल्याचे आरोप करत आहे.
स्कॉट यांनी आरोप केला आहे, की अमेरिकन फंडाचा वापर डब्ल्यूएचओ कम्युनिस्ट चीनच्या बचावासाठी करत आहे. एवढेच नाही, तर त्यांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासंदर्भात डब्ल्यूएचओच्या भूमिकेचे अन्वेषण करण्याची मागणीही काँग्रेसकडे केली आहे.
WHOची भूमिका तपासावी -रिक स्कॉट हे फ्लोरिडातील रिपब्लिकन सिनेटर आहेत. त्यांनी अमेरिकन काँग्रेसला आवाहन केले आहे, की कोरोना व्हायरसचा सामना करण्यासंदर्भात डब्ल्यूएचओच्या रिस्पॉन्सचे अन्वेषण व्हावे. एवढेच नाही, तर अमेरिकेने डब्ल्यूएचओला दिल्या जाणाऱ्या फंडिंगमधयेही कपात करावी. कारण डब्ल्यूएचओ कोरोना व्हायरससंदर्भात 'कम्युनिस्ट चीनचा बचाव करत आहे, असा सल्लाही स्कॉट यांनी दिला आहे. स्कॉट यांनी यापूर्वीही चीन आणि डब्ल्यूएचओच्या जवळीकतेवरून चिंता व्यक्त केली होती. त्यांचा आरोप आहे, की चीनने तेथील मृत्यूदर कमी करून दाखवला आहे.
खरी माहिती लपवत आहे WHOपॉलिटिको या संकेतस्थळानुसार, प्रत्येक देशाला आपल्या नागरिकांना सुरक्षित ठेवता यावे यासाठी, जन आरोग्याची माहिती जगाला देणे. हे डब्ल्यूएचओचे काम आहे. मात्र, कोरोना व्हायरससंदर्भात डब्ल्यूएचओ अयशस्वी ठरला, असे स्कॉट यांनी मंगळवारी म्हटले आहे.
जाणूनबुजून भ्रम निर्माण करत आहे डब्ल्यूएचओ -
डब्ल्यूएचओ जाणूनबुजून भ्रम निर्माण करणारी माहिती पसरवत आहे. 'चीन आपल्या देशातील कोरोना बाधितांसंदर्भात खोटे बोलत आहे, हे आम्हाला माहिती आहे. तसेच डब्ल्यूएचओला चीनबद्दल संपूर्ण माहिती होती. मात्र तरीही त्याचा तपास करावा असे त्यांना वाटले नाही, असेही स्कॉट यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनीही केला होता आरोप -
याच पद्धतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही व्हाईट हाऊसमधील एका पत्रकार परिषदेत डब्ल्यूएचओवर अशाच प्रकारचे आरोप केले होते. यावेळी डब्ल्यूएचओने कोरोनासंदर्भात माहिती लपवली. तसेच ते चीनची बाजू घेत चीनचाही बचाव करत आहे. याची कल्पना जगा दिली असती तर एवढे मृत्यू झाले नसते, असेही ट्रम्प यांनी म्हटले होते.