अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी इंडियानामधील मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात हल्लेखोरासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण यामध्ये जखमी झाले आहेत. स्थानिक मीडियाने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, इंडियाना मॉलमध्ये रविवारी एका फूड कोर्टमध्ये गोळीबार करण्यात आला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला.
ग्रीनवूड पोलीस विभागाचे प्रमुख जिम इसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण यामध्ये जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस प्रमुखांच्या माहितीनुसार, संध्याकाळी सहा वाजता मॉलमधील फूड कोर्टमध्ये गोळीबार होत असल्याचे फोन कॉल सेंटरमध्ये येऊ लागले होते.
हल्लेखोराकडे एक मोठी रायफल होती. या हल्ल्यामागील नेमकी माहिती समोर आली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मी थेट कमांड पोस्टच्या चर्चेत असून, सध्या कोणताही धोका नाही अशी माहिती मेयर मार्क यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिली आहे. याआधी देखील अमेरिकेत गोळीबाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.