America slams Israel over attack on Rafah: इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यात दीर्घकाळापासून युद्ध सुरु आहे. गाझापट्टीत दोन्ही बाजूने हल्ले केले जात आहेत. तशातच इस्रायलने सोमवारपासून राफा शहरातही आक्रमकपणे लष्करी कारवाई सुरू केली. इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत, असे मोठे विधानही इस्रायलच्या पंतप्रधानांनी केले. पण राफा शहरावर हल्ले न करण्याचा सल्ला अमेरिकेने इस्रायलला दिला होता. पण अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने राफावरह हल्ला केला. त्याचा फटका आता इस्रायलला बसू लागला आहे. आपल्याला न जुमानणाऱ्या इस्रायलबाबत अमेरिकेने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेने इस्रायलला दिली जाणारी सैन्याची लष्करी मदत थांबवली आहे. इस्रायलचे राफावरील हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. अल अरबिया मीडिया आउटलेटशी बोलताना एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, राफामध्ये अमेरिकेच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे इस्रायलला शस्त्रास्त्रांची निर्यात थांबवण्यात आली आहे. राफाहमध्ये कारवाई सुरू करण्यापूर्वी एक लाख पॅलेस्टाइन नागरिकांना इस्रायली लष्कराने राफामधून निघून जाण्याचे आदेश दिले होते. राफामध्ये 17 लाखांहून अधिक पॅलेस्टिनी आहेत. त्यातही सुमारे 14 लाख नागरिक असे आहेत जे आपला जीव वाचवण्यासाठी उत्तर गाझामधून राफामध्ये आश्रयासाठी आले आहेत.
इस्रायलने जेव्हा राफावर हल्ला करण्याची धमकी दिली होती, त्याच वेळी अमेरिकेने सार्वजनिक स्तरावर आणि खाजगीरित्या अशा हल्ल्यांच्या कारवाईला विरोध केला होता. राफामधील कोणत्याही कारवाईपूर्वी नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष योजना आवश्यक असल्याचे अमेरिका सुरुवातीपासून सांगत आहे. बायडेन प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी अल अरेबियाला सांगितले की अमेरिका आणि इस्रायली अधिकारी राफामध्ये काही विषयांवर चर्चा करत आहेत. गाझामधील इतर ठिकाणांच्या तुलनेत राफामध्ये हमासवर वेगळ्या पद्धतीने आक्रमण करण्यासाठीचा मार्गही शोधण्याचा प्रयत्न चर्चेचा एक विषय आहे. उत्तर गाझामध्ये हजारो नागरिक आधीच मारले गेले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना इजा न करता हमासचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याकडे इस्रायलचा कल असायला हवा, असे अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले.