ओरेगॉन: अमेरिकेच्या ओरेगॉन प्रांताने एप्रिल महिन्याला शीख अमेरिकन समुदायाकडून साजरा केला जाणारा वैशाखी महिना असे घोषित केले आहे. 14 एप्रिल रोजी वैशाखी हा सण साजरा केला जातो. ओरेगॉनचे गव्हर्नर केट ब्राऊन यांनी एप्रिलला वैशाखी महिना घोषित करण्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली. या घोषणापत्रात, अमेरिकेतील शीख समुदाय शेती, अभियांत्रिकी, वैद्यकसेवा, विज्ञान आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत राहून देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये भर घालत असल्याचे नमूद केले आहे. शीख समुदायाच्या इतिहासात वैशाखीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याला वैशाखी म्हणून घोषित करण्याचा निर्णय ओरेगॉनने घेतला आहे. असा निर्णय घेणारे ओरेगॉन हे अमेरिकेतील चौथे राज्य बनले आहे. यापुर्वी इंडियाना, डेलावेर आणि न्यू जर्सी या राज्यांनी एप्रिलला वैशाखी म्हणून घोषित केले.अमेरिकन शीख समुदायाच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची घटना असल्याची प्रतिक्रिया ओरेगॉनमधील व्यावसायिक आणि गदर मेमोरियल फाऊंडेशनचे अध्यक्ष बहादूर सिंग यांनी दिली. त्यांच्या अध्यक्षतेखालील प्रतिनिधीमंडळाने या घोषणापत्राचा स्वीकार केला.
अमेरिकेतील 'या' राज्यात आता एप्रिल ओळखला जाणारा वैशाखीचा महिना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 2:08 PM