हमासने केलेला हल्ला आम्ही रोखण्यात असमर्थ ठरल्याचे इस्राय़ल सैन्याने कबूल केले आहे. याचबरोबर पंतप्रधान नेतन्याहू यांनी सैन्याला खुली छूट दिल्याने सैनिकही कोणताही अडथळा न जुमानता गाझा पट्टीमध्ये घुसू लागले आहेत. इस्रायलने आता मागचा पुढचा विचार करण्याची वेळ नसून युद्धाची वेळ असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दिला असला तरी युएनमात्र इस्रायलच्या विरोधात उभे ठाकले आहे.
गाझा शहरात फिलिस्तीनची निम्मी लोकसंख्या राहते. जवळपास १० लाख लोकांना इस्रायलने शहर खाली करण्यास सांगितले आहे. गाझामध्ये राहणारे नागरिक आमचे शत्रू नाहीएत. परंतू, आम्हाला हमासला संपवायचे आहे, असे इस्रायलने म्हटले आहे. यावरून पुढचे युद्ध किती भीषण असेल याची कल्पना येत आहे.
इस्रायलच्या या आदेशावरून युएन विरोधात उभे ठाकले आहे. या भागात दहा लाख लोक राहतात. त्यांना अचानक निघून जाण्यास सांगणे म्हणजे त्यांच्या आयुष्यासोबत खेळ करण्यासारखे असल्याचे युएनचे प्रवक्त्यांनी म्हटले आहे. यामुळे मानवीय संकट निर्माण होईल यामुळे इस्रायलने आपला आदेश मागे घ्यावा, असे युएनने म्हटले आहे.
इस्रायलच्या हल्ल्याविरोधात हमासने शुक्रवारी जगभरात निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. पॅलेस्टिनींना वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीकडे कूच करण्यास सांगितले आहे. तसेच इस्रायलच्या सैनिकांसोबत हवे ते करण्यासाठी वागण्यासाठी हमासने आपल्या समर्थकांना खुली छुट दिली आहे.
सततच्या हवाई हल्ल्यांमुळे गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयातील शवागारात मृतदेहांचा खच पडला आहे. हे मृतदेह ठेवण्यासाठी शवागृहात जागा नाहीय. त्यांची ओळखही पटत नाही आणि त्यांची विचारपूस करायलाही कोणी येत नाहीय असे डॉक्टरांनी सांगितले आहे.