लाहोर : भारताच्या पाकिस्तानशी असलेल्या शत्रुत्वात अमेरिकेने एक पाऊल पुढे टाकले असून, पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाचे त्याला नुकसान करायचे आहे, असे ‘जमात उद दावाचा’ (जेयूडी) प्रमुख हाफीज सईद याने शनिवारी म्हटले. अमेरिकेने अफगाण तालिबानचा प्रमुख मुल्ला अख्तर मन्सूर याला बलुचिस्तानात ड्रोन हल्ल्यात ठार मारून पाकिस्तानकडून काही प्रतिक्रिया येतेय का याची परीक्षा घेतली. प्रत्यक्षात अमेरिकेचे लक्ष्य हे पाकिस्तानचा आण्विक कार्यक्रम असून, भारत आणि इस्रायलच्या मदतीने त्याची हानी त्याला करायची आहे, असे सईदने म्हटले. तो जमात ऊद दावाची घटक संस्था असलेल्या फलाह- ए- इन्सानयत फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत येथे चाऊबुर्जीत असलेल्या जेयूडीच्या मुख्यालयात बोलत होता. २१ मे रोजी बलुचिस्तानमध्ये ड्रोन हल्ल्यात मन्सूरला ठार मारण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या भेटीवर आलेल्या वरिष्ठ पातळीवरील अमेरिकन शिष्टमंडळाकडे पाकिस्तानने या ड्रोन हल्ल्याचा निषेध नोंदविला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सईदने वरील मत व्यक्त केले. ड्रोन हल्ल्यामुळे द्विपक्षीय संबंधांत कटुता आली असल्याचे पाकिस्तानचे मत आहे. (वृत्तसंस्था)
पाकचा आण्विक कार्यक्रम अमेरिकेचे लक्ष्य - सईद
By admin | Published: June 13, 2016 6:32 AM