अमेरिकेने पाकिस्तान या दहशतवाद्यांना पोसणाऱ्या देशाला धोकादायक देश म्हणून घोषित करण्याची तयारी सुरु केली आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना अमेरिकेत ये-जा करण्यावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना प्रवासासाठी गाडलाईन जारी केली असून भारत-पाक बॉर्डरवरील बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा या भागात न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दहशतवाद आणि सशस्त्र संघर्ष उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या धोक्यांमुळे पाकिस्तानात जाण्याबाबत अमेरिकी नागरिकांनी पुनर्विचार करावा असे वॉशिंग्टनने म्हटले आहे. इस्लामाबादमध्ये, अधिक सुरक्षा संसाधने आणि पायाभूत सुविधा आहेत आणि या भागातील सुरक्षा दल देशाच्या इतर भागांपेक्षा आपत्कालीन परिस्थितीला अधिक त्वरित प्रतिसाद देऊ शकतात. कोणत्याही कारणास्तव नियंत्रण रेषेवरून तसेच भारत-पाकिस्तान सीमेवरून प्रवास करू नका. या भागात दहशतवादी गट सक्रिय असल्याचे संकेत मिळत आहेत.
दहशतवादी कोणतीही पूर्वसूचना न देता हल्ले करू शकतात. वाहतूक केंद्रे, शॉपिंग मॉल्स, लष्करी प्रतिष्ठाने, विमानतळ, विद्यापीठे आणि प्रार्थनास्थळे अशा विविध ठिकाणांवर हल्ले करू शकतात. अमेरिकन सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या मेळाव्यांना हजर राहण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
पाकिस्तानींवर बंदी...काही देशांच्या सुरक्षा आणि तपासणी जोखमींच्या पुनरावलोकनावर आधारित ही बंदी आहे, असे रॉयटर्सला सुत्रांनी सांगितले आहे. पाकिस्तानच नाही तर इतर देशांचाही यात समावेश असू शकतो, असे यात म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र विभाग, न्याय, गृह सुरक्षा आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालक कार्यालय हे यावर काम करत आहेत.