ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन , दि. 15 - इसीसचे तळ उद्ध्वस्त करण्याच्या हेतून अमेरिकेने अफगाणिस्तानातील ननगरहार भागात केलेल्या शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्बहल्ल्यात जवळपास 90 दहशतवादी ठार झाले आहेत. इसिसचे दहशतवादी वापरत असलेले बंकर आणि बोगद्यांना लक्ष्य करण्याच्या इराद्याने 9800 किलो वजनाचा हा बॉम्ब टाकण्यात आला. अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यामुळे इसिसचं जबरदस्त नुकसान झालं असून त्यांचे 90 दहशतवादी ठार करण्यात यश मिळालं आहे. स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास हा हल्ला केला गेला.
जगभरात दहशत पसरवलेल्या इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेच्या तळांना नष्ट करण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानातील ननगरहार भागात जगातील सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्बहल्ला केला. पाकिस्तानच्या सीमेजवळ ननगरहार प्रांतात अचिन जिल्ह्यात इसिसचे बोगदे आणि बंकर असलेल्या परिसरात स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास हा हल्ला केला गेला. अफगाणिस्तानमधून इसिसचा पूर्ण सफाया करेपर्यंत अमेरिका सैन्य कारवाई करीत राहणार असल्याचेही अमेरिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ अशी ओळख असणाऱ्या २१ हजार पौंड वजनाच्या या बॉम्बच्या स्फोटाने दहशतवादी जगताला हादरा तर बसलाच, शिवाय अमेरिकेने आपल्या शक्तीचे पुन्हा दर्शन घडविले. ज्या भागात ‘जीबीयू ४३ बी मॅसिव्ह ऑर्डिनेन्स एअर ब्लास्ट’ बॉम्ब टाकण्यात आला तो इसिसचा प्रभाव असलेला परिसर आहे.
जीबीयू ४३ हे सर्वात मोठे शक्तिशाली हत्यार समजले जाते. व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव शॉन स्पाईजर यांनी सांगितले की, इसिसचे बोगदे आणि बंकरला या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यात नागरिकांचे मृत्यू टाळण्यासाठी अमेरिकेने या हल्ल्यापूर्वी आवश्यक ती सर्व सावधानता बाळगली होती. इसिसविरुद्धची लढाई आम्ही अतिशय गांभीर्याने घेतली आहे. हा हल्ला इसिसला पराभूत करण्याच्या मोहिमेचा एक भाग आहे.
विघातकता किती?
- १ हजार यार्डामध्ये आगीच्या ज्वाळा पसरतात.
- १ मैल परिसरातील लोकांना, इलेक्ट्रॉनिक वस्तू, लाइट्स, वाहने यांना मोठी झळ, हादऱ्याने मृत्यू.
- १.७ मैल परिसरातील लोकांचा धक्क्याने मृत्यू होऊ शकतो. अनेक घरांना/इमारतींना तडे जाऊ शकतात.
- २ मैल परिसरातील लोकांना आवाजाने बहिरेपण येऊ शकते.
- ५ मैल परिसरात भूकंपसदृश धक्के बसतात.
- ३0 मैल परिसरातून या बॉम्बच्या १० हजार फूट उंच पोहोचलेल्या मशरूमच्या आकाराचे धूराचे लोळ दिसतात.
या स्फोटाचे राजकीय जगात परिणाम काय?
- अमेरिकेशी कटुता असणाऱ्या रशियावर मोठा दबाव.
- दक्षिण चीन समुद्रावर दावा करणाऱ्या चीनला इशारा.
- बॉम्बखोर उत्तर कोरियाला अमेरिकेने शक्ती दाखवली.
- दहशतवाद्यांना पाळणाऱ्या पाकिस्तानला मोठा इशारा.