दमास्कस : सीरियाचा हुकूमशहा बशर अल-असद याने काही आठवड्यांपूर्वी आपल्याच देशातील विरोधकांवर रासायनिक हल्ला केल्यानंतर अमेरिका, फ्रान्स व ब्रिटन या देशांनी एकत्र येऊ न शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सीरियातील ३0 ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ला केला. सीरियाच्या लष्करी ठिकाणांवर हा हल्ला करण्यात आला असून, त्या वेळी किमान १0३ क्षेपणास्त्रे डागण्यात आली, असे सांगण्यात येते. त्यातील ७१ क्षेपणास्त्रे आम्ही हवेतच नष्ट केली, असा दावा सीरियाच्या लष्कराने केला आहे.टॉमहॉक क्षेपणास्त्रांद्वारे सीरियातील रासायनिक ठिकाणांवरही हल्ला करण्यात आला. या कारवाईचा निषेध करतानाच, रशियाने आपल्या सीरियातील लष्करी तळांचे यामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा केला आहे. इस्रायलने हल्ल्याचे समर्थन केले आहे, तर इराणने हल्ल्यावर टीका करताना, तीन देशांनी केलेले हे गुन्हेगारी कृत्य असल्याचे म्हटले आहे.सीरियाची राजधानी दमास्कसपर्यंत या हल्ल्यांमुळे झालेल्या स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. बशर अल असद जोपर्यंत रासायनिक हल्ले थांबवत नाहीत, तोपर्यंत आमची कारवाई सुरूच राहील, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेने २0१७ सालीही टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी सीरियाच्या हवाई दलाच्या तळांवर हल्ला चढवूनते नष्ट केले होते.या हल्ल्यांमुळे आधीच गृहयुद्धात ७० टक्के भाजून नष्ट झालेला सीरिया पूर्णपणेच उद्ध्वस्त होण्याजी भीती व्यक्त होत आहे. सीरियात २0१२ पासून गृहयुद्ध सुरू असून, त्यात देशाचा प्रचंड प्रदेश पूर्णत: उद्ध्वस्त झाला असून, हजारो लोक मरण पावले आहेत. असद यांना अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स सुरुवातीपासून विरोध करीत आले असून, त्यांना इराकच्या सद्दाम हुसेन याप्रमाणेच असद यालाही संपवून टाकण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. दुसरीकडे रशिया व इराण मात्र अदस याला आर्थिक, तसेच शस्त्रांची मदत करीत आहेत. सीरियातील असद यांच्या विरोधकांवर रशियानेही अनेकदा हल्ले केले आहेत.मध्यंतरी असद यांच्या लष्कराने विरोधक असलेल्या डुमा शहरात रासायनिक हल्ले केले होते. त्यातील एका हल्ल्यात ८0 लोक मारले गेले होते. त्यात लहान मुले अधिक होती. अनेकांचा मृत्यू गुदमरून झाला होता. त्यानंतर, सीरियावर हल्ला करण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प सातत्याने देत होते.रासायनिक हल्ल्याची मोठी किंमत रशिया व इराण यांना मोजावी लागेल, असे त्यांनी बोलून दाखविले होते. अमेरिकेच्या हल्ल्याच्या कारवाईला ब्रिटन व फ्रान्स यांनी पाठिंबा व मदत देण्याचे मान्य केल्यानंतर, आज पहाटे प्रत्यक्ष हल्ले सुरू झाले. (वृत्तसंस्था)बंडखोरांकडे शस्त्रेविरोधकांच्या हाती शस्त्रे येताच, लष्कर व बंडखोर यांच्यात गृहयुद्धच सुरू झाले. पुढील वर्षी २0१२ मध्ये गृहयुद्ध अधिकच तीव्र झाले आणि देशाच्या काही भागांत बंडखोरांनी आपली समांतर सरकारे स्थापन केली. त्यांना अमेरिका व मित्र राष्ट्रांचा पाठिंबा होता.तेव्हा रशिया व इराण हे असद यांच्या मदतीला धावले. त्यांच्या साह्याने असद यांनी २0१५ साली बंडखोरांच्या हातून भूभाग मुक्त करायला, म्हणजेच पुन्हा ताब्यात घ्यायला सुरुवात केली.या गृहयुद्धानंतर हजारो लोकांनी युरोपमधील, तसेच अन्य राष्ट्रांत आश्रय घेतला.शिया विरुद्ध सुन्नी : या गृहयुद्धाला शिया विरुद्ध सुन्नी हेही एक कारण आहे. असद हे शिया असल्याने तेथील सुन्नींंचा त्यांना विरोध आहे. बंडखोरांमध्ये त्यांचा सहभाग मोठा आहे. इसिसचा वाढता प्रभाव हेही अंतर्गत कलहाचे प्रमुख कारण आहे. इराकमध्येही शिया विरुद्ध सुन्नी संघर्ष व इसिसचा प्रभाव ही कारणे होती.काय आहे प्रकरणबशर अल-असद याने २000 साली आपले वडील हाफेज अल असद यांच्याकडून देशाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर, ११ वर्षे देशात शांतता होती, पण २0११ साली त्यांच्याविरोधात बंडाला सुरुवात झाली.हे बंड चिरडून काढण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब सुरू केला. त्यासाठी क्रूर पद्धत अवलंबली गेली. त्यामुळे विरोधाची धार आणखी वाढली आणि देशभर असदच्या विरोधात आंदोलने सुरू झाली. त्याच्या राजीनाम्याची मागणी त्यातून पुढे आली.
सीरियावर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सचे हवाई हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 3:24 AM