वॉशिंग्टन - अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस शुक्रवारी सुमारे 1 तास 25 मिनिटांसाठी अमेरिकेच्या राष्ट्रपती बनल्या होत्या. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन शुक्रवारी नियमित ‘कोलोनस्कॉपी’ तपासणीसाठी वॉल्टर रीड नॅशनल मिलिट्री मेडिकल सेंटर येथे गेले होते. यावेळी काही वेळासाठी त्यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सत्तेची सूत्र सोपवली होती. बायडेन राष्ट्रपती झाल्यानंतर पहिल्यांदाच नियमित तपासणीसाठी वाशिंग्टनमधील उपनगर परिसरातील मेडिकल सेंटरवर गेले होते.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, 'कोलोनोस्कोपी' दरम्यान बायडेन 'अनेस्थेसिया'च्या प्रभावाखाली राहतील, म्हणून त्यांनी थोडावेळासाठी हॅरिस यांच्याकडे सत्ता सोपवली. हॅरिस यांनी पाऊण तास अध्यक्ष म्हणून काम करण्याची ही पहिलीच वेळ होती. साकी म्हणाल्या, बायडेन यांनी स्थानिक वेळेनुसार 11:35 वाजता हॅरिस आणि व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ रॉन क्लेन यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुन्हा आपली जबाबदारी स्वीकारली.
अमेरिकेन राज्यघटनेनुसार कुठल्याही परिस्थितीत देश राष्ट्रपतीशिवाय राहू शकत नाही. राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत, उपराष्ट्रपती हा देशाचा सर्वोच्च मानला जातो.
अमेरिकेच्या इतिहासात यापूर्वीही राष्ट्रपतींनी आपले अधिकार उपराष्ट्रपतींना दिले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी 2002 आणि 2007 मध्ये कोलोनोस्कोपी दरम्यान हीच पद्धत अवलंबली होती. ज्यो बायडेन हे या वर्षी 79 वर्षांचे होणार आहेत. ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष आहेत.