वॉशिंग्टनः अमेरिकेनं बुधवारी इराणकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या चिनी कंपन्यांवर प्रतिबंध लादले आहेत. संयुक्त राज्य अमेरिकेचे राज्य सचिव माइक पॉम्पियो म्हणाले, अमेरिकेनं इराणकडून तेल खरेदी करण्यास मज्जाव केला असतानाही काही चिनी कंपन्यांनी इराणकडून तेल खरेदी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अमेरिकेनं प्रतिबंध लादले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये समझोता घडवून आणण्यासाठी युरोपकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. परंतु अमेरिकेनं या प्रकरणात दबाव आणखी वाढवला आहे.अमेरिकेनं लादलेले निर्बंधांचं उल्लंघन केल्यामुळेच चिनी कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात आल्याचं पॉम्पियो यांनी सांगितलं आहे. तत्पूर्वी अमेरिकेने इराणचे ड्रोन विमान पाडल्याचा दावा केल्यानंतर पुन्हा होरमुज खाडीक्षेत्रामध्ये तणाव निर्माण झाला होता. यानंतर इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी इंग्लंडचा एक तेलवाहू टँकर आणि काही मालवाहू जहाजे जप्त केली होती. इंग्लंडच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली होती. युकेचा झेंडा असलेले स्टेना इम्पेरो या तेलवाहू जहाजाला आंतरराष्ट्रीय सीमेमध्ये असताना हेलिकॉप्टर आणि चार जहाजांच्या मदतीने घेरण्यात आले. यानंतर या जहाजावर ताबा घेण्यात आला. या टँकरमध्ये एकूण 23 कर्मचारी असून यामध्ये भारतीय नागरिकही आहेत, असे इंग्लंडने प्रसिद्धिपत्रकामध्ये म्हटले होते.
इराणकडून तेल खरेदी करणाऱ्या चिनी कंपन्यांवर अमेरिकेचे प्रतिबंध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 10:28 AM