दकार (सेनेगल) : पश्चिम आफ्रिकेत इबोला उद्रेकातील बळींची संख्या एक हजारावर गेली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, या आजारावरील उपचारासाठी प्रायोगिक तत्त्वावर लसीचा वापर करण्यास मुभा देण्यात आली आहे.गिनी, सिएरा लिओन व लायबेरियात पसरलेल्या या साथीमुळे आतापर्यंत १,०१३ नागरिकांचा बळी गेला असल्याचे या संघटनेने सांगितले. याशिवाय लागण झालेल्या किंवा संशयित रुग्णांची संख्या १, ८४८च्या घरात आहे. इबोलाची लागण झाल्यास प्रचंड ताप येऊन उलट्या आणि रक्तस्राव होतो. गिनीत इबोलाची साथ पसरल्याचे सर्वप्रथम गत मार्चमध्ये निदर्शनास आले होते. मात्र, त्यापूर्वीच तेथे इबोलाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली असण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या इबोला बळींच्या सुधारित यादीत सात आणि नऊ आॅगस्टदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या व लागण झालेल्या रुग्णांची संख्या अंतर्भूत आहे. या काळात आणखी ५२ रुग्णांचा बळी गेला तर ६९ जणांना लागण झाली. इबोला हा अत्यंत घातक आजार असून त्यावर लस तसेच कोणतेही औषध नाही. मात्र, आतापर्यंत तीन रुग्णांवर प्रायोगिक औषधांद्वारे उपचार करण्यात आले आहेत. पश्चिम आफ्रिकी देशांसह नायजेरियातही साथ पसरण्याचा धोका आहे. विमानाने येथे आलेल्या एका व्यक्तीला इबोलाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. अमेरिका, ब्रिटनसह युरोपियन देशांनी सतर्कतेचा इशारा जारी केला असून बांगलादेश आणि भारतातही सतर्कता बाळगण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)
इबोलावरील उपचारासाठी प्रायोगिक औषधांचा वापर
By admin | Published: August 13, 2014 4:01 AM