ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 5 - अमेरिकेने जगातील सर्वात पहिली आण्विक विमानवाहू युद्धनौका यूएसएस इंटरप्राइजला सेवामुक्त केलं आहे. या युद्धनौकेनं क्युबा मिसाइल संकट, व्हिएतनाम, इराक आणि अफगाणिस्तानच्या युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. भारत आणि पाकिस्तानच्या 1971च्या युद्धातही अमेरिकेनं भारताच्या विरोधात पाकिस्तानच्या मदतीसाठी बंगालच्या उपसागरात यूएसएस इंटरप्राइज ही युद्धनौका पाठवली होती.
यूएसएस इंटरप्राइज 1961मध्ये अमेरिकेच्या ताफ्यात दाखल झाली होती. जगातील सर्वात पहिली आण्विक विमानवाहू युद्धनौका असून, बराच काळ या युद्धनौकेनं अमेरिकेच्या नौदलात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या युद्धनौकेला जवळपास 10 अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे नेतृत्व लाभले आहे.
या युद्धनौकेनं पृथ्वीच्या 40 फे-या मारल्याच्या समकक्ष प्रवास केला आहे. या युद्धनौकेला निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ती जवळपास 4 वर्ष चालणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या 1971च्या युद्धात पाकिस्तानच्या मदतीसाठी बंगालच्या उपसागरात ही युद्धनौका पोहोचण्याच्या आधीच पाकिस्तानने आत्मसमर्पण केलं होतं. पाकिस्तानने आत्मसमर्पण केल्यामुळे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनही हवालदिल झाले होते.