वॉशिंग्टन : अमेरिकेच्या ४ जुलै रोजी असलेल्या स्वातंत्र्य दिनापर्यंत कोरोना साथीला आळा घालून त्या देशातील स्थिती पूर्वीसारखी सुरळीत करण्याचा निर्धार राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला आहे. येत्या १ मे पासून अमेरिकेतील सर्व प्रौढ नागरिकांना कोरोना लस देण्यात येईल, अशीही घोषणा त्यांनी केली आहे. बायडेन यांनी गुुरुवारी सांगितले की, कोरोना साथीच्या कचाट्यातून अमेरिकेला मुक्त करण्यासाठी आमच्या सरकारने महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. ती यशस्वी झाली तर अमेरिकी नागरिक पूर्वीप्रमाणे मुक्त संचार करत स्वातंत्र्य दिन साजरा करू शकतील. अमेरिकेतील कोरोना साथीचा फटका बसलेल्यांना १.९ ट्रिलियन डॉलरची आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव अमेरिकी काँग्रेसने मंजूर केला. त्यावर बायडेन यांनी स्वाक्षरी केली.
बायडेन म्हणाले की, अमेरिकेत कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून नव्या रुग्णांचा शोध सतत घेण्यात येईल. त्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत व अमेरिकेच्या स्थितीत काहीशी सुधारणाही झाली आहे. अमेरिकेच कोरोना लसींची निर्यात करण्यावर कोणतीही बंधने असणार नाहीत.
महायुद्धांपेक्षाही अधिक बळी
कोरोनाची साथ सर्व जगात पसरली आहे असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केल्याला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी सांगितले की, अमेरिकेत २ कोटी ९९ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण असून त्यातील २ कोटी ७ लाख लोक बरे झाले तर ५ लाख ४३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा हा पहिले व दुसरे महायुद्ध तसेच व्हिएतनाम युद्ध, ९/११ दहशतवादी हल्ला यांतील एकूण बळींपेक्षा अधिक आहे.
लसीचा मुद्दा राष्ट्रवादाशी जोडू नका : संयुक्त राष्ट्रे
कोरोना लसींची निर्मिती करणाऱ्या देशांनी राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे करत लसी स्वत:कडेच ठेवल्या आहेत, अशी टीका संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी केली आहे. ते म्हणाले की, कोरोना लस उत्पादकांशी काही देशांनी केलेल्या करारांमुळे जगातील सर्व देशांना लसीचे समन्यायी वाटप करणे अशक्य बनले आहे.