एका व्यक्तीला समुद्र किनारी वाळूखाली दबलेली एक हिऱ्याची अंगठी सापडली. त्या व्यक्तीने या अंगठीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर ईमानदारीचा परिचय देताना ही अंगठी त्याने मूळ मालकाला परत केली.
३७ वर्षांच्या जोसेफ कूक यांनी मेटल डिटेक्टरच्या मदतीने लाखो रुपयांची ही अंगठी फ्लोरिडामधील सेंट अगस्टी येथील हॅमोक बीचवर शोधली होती. ही अंगठी सापडताच जोसेफ यांन आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी अशा प्रकारचा हिरा समुद्र किनारी कधीही सापडला नसल्याचे सांगितले.
अंगठी मिळाल्यानंतर त्यांनी या अंगठीच्या मालकाचा शोध लागावा म्हणून एक व्हिडीओ काढून तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. तसेच अनेक स्थानिक ज्वेलरी स्टोअर्सनाही फोन केला. दरम्यान, जवाहिरांनी या अंगठीची किंमत ३२ लाख रुपये असल्याचे सांगितल्याची माहिती जोसेफ यांनी दिली. अंगठी मिळाल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनंतर जोसेफ यांना एका नंबरवरून अनेक फोन आले. मात्र ते त्यांनी उचलले नाही. नंतर हा फोन कदाचित अंगठीच्या मूळ मालकाचा असावा, असे त्यांना वाटले. त्यानंतर त्यांची फ्लोरिडातील जॅक्सविले येथे राहणाऱ्या एका जोडप्याशी बोलणं झालं. त्यांची अशीच अंगठी हरवली होती. हे जोडपंच अंगठीचं खरं मालक होती. जोसेफ यांनी त्यांनी ती अंगठी परत केली. तेव्हा हे जोडपं खूप आनंदी झालं.