कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जगात जो हाहाकार उडाला, त्यातून लोक अजूनही सावरलेले नाहीत. अनेक दुष्परिणामांचा त्यांना अजूनही सामना करावा लागतोय आणि त्यांच्या आयुष्याची घडी अजूनही नीट बसलेली नाही. त्यातच चीनसारख्या देशांत पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याच्या बातम्या आल्यानंतर तर सर्वसामान्यांच्या पोटात गोळाच आला. आता पुढे आणखी काय वाढून ठेवलंय, या शंकेनं कालवाकालव सुरू झाली. नव्या लॉकडाऊनच्या भीतीनं जग चिंतेत असताना ऑस्ट्रेलियानं मात्र आपल्या देशात एकदम कडेकोट ‘लॉकडाऊन’ सुरूही केलाय. अर्थात हा लॉकडाऊन आहे मधमाश्या आणि त्यांच्या पोळ्यांसाठी. एवढंच नाही, ऑस्ट्रेलियानं आपल्या देशातील लक्षावधी मधमाश्यांची अक्षरश: कत्तल करायला सुरुवात केली आहे.
खरं पाहिलं तर ऑस्ट्रेलिया हा जगातील मध निर्यात करणारा प्रमुख देश. आज जगभरात सर्वाधिक मध ऑस्ट्रेलियाकडूनच पुरवला जातो. मधमाश्यांच्या अक्षरश: लक्षावधी वसाहती ऑस्ट्रेलियामध्ये आहेत आणि त्यातून कोट्यवधी डॉलर्सचा महसूल ऑस्ट्रेलियाला मिळतो. असं असतानाही मग ऑस्ट्रेलिया स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड का मारून घेतो आहे? मधमाशीपालनाच्या ज्या व्यवसायावर हजारो कुटुंबं अवलंबून आहेत, त्यांच्या पोटावर लाथ का मारली जात आहे?...
त्याचंही एक महत्त्वाचं कारण आहे. ‘व्हॅरोआ माइट’ नावाचे परजीवी कीटक मधमाश्यांच्या पोळ्यांवर सध्या जगभरात आक्रमण करताहेत. हा कीटक मधमाश्यांवर हल्ला करतो आणि त्यांचं शोषण करतो. या परजीवी किटकामुळे मधमाश्यांची केवळ क्षमताच कमी होत नाही, तर त्या अर्धमेल्या होतात आणि त्यांचं संपूर्ण पोळंच या किटकांमुळे संक्रमित होतं. या किटकांचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे व्हॅरोआ माइट जातीचा केवळ एक कीटकही मधमाश्यांचं अख्खं पोळं संक्रमित करून नष्ट करू शकतो. हा कीटक मधमाश्यांच्या अंगाला चिटकतो आणि त्यानंतर एक-एक करत संपूर्ण पोळ्यावरच कब्जा करतो. माणसं जसं कोरोना किंवा इतर कुठल्या संसर्गजन्य रोगाची शिकार झाल्यावर स्वत:ला इतरांपासून विलग ठेवतात, सोशल डिस्टन्सिंग करतात, त्याचप्रमाणे मधमाश्याही स्वत:हून सोशल डिस्टन्सिंग करतात. आपल्याला एखाद्या रोगाचा संसर्ग झाला आहे, हे त्यांना कळलं की, इतर मधमाश्यांना आपला संसर्ग होऊन त्या आजारी पडू नयेत म्हणून या मधमाश्या लगेच इतरांपासून स्वतंत्र होतात आणि संक्रमणाचा धोका कमी करतात. व्हॅरोआ माइट हा परजीवी कीटक मात्र इतक्या झपाट्यानं आक्रमण करतो की, विलगीकरणामुळेही फारसा फरक पडत नाही.
संपूर्ण जगभरात या किटकानं मधमाश्या आणि त्यांच्या पोळ्यांवर हल्ला करून धुमाकूळ घातला असला, तरीही ऑस्ट्रेलियानं मात्र आत्तापर्यंत या किटकांच्या हल्ल्याला रोखून धरलं होतं. मात्र, या हल्ल्याला रोखणं त्यांच्याही हाताबाहेर गेल्यानं त्याचा दुष्परिणाम मधमाश्यांना भोगावा लागतोय. मधमाश्यांच्या ज्या वसाहती चांगल्या आहेत, जिथे अजून या किटकांची टोळधाड पोहोचलेली नाही, त्या वसाहती तरी वाचाव्यात आणि इतरांना त्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून ऑस्ट्रेलिया आता अतिव काळजी घेत आहे. या किटकांचा प्रादुर्भाव मर्यादित करण्यासाठी जैवसुरक्षा उपायांच्या विस्तृत श्रेणीचा भाग म्हणून मधमाश्यांच्या वसाहती आता ‘लॉकडाऊन’ करण्यात येत आहेत. व्हॅरोआ माइट या किटकाचा आकार तिळाच्या दाण्याएवढा असून, तो परजीवी आहे. दोन आठवड्यांपूर्वीच सिडनी येथे या किटकांचं अस्तित्व आढळून आल्यानं ऑस्ट्रेलियातील करोडो डॉलरच्या मध व्यवसायावर जणू संक्रांत आली आहे. हे व्यावसायिक अक्षरश: भयभीत झाले आहेत. न्यू साउथ वेल्सचे चीफ प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर सतेंद्र कुमार यांनी यासंदर्भात सांगितलं, ‘या किटकांनी जर मधमाश्यांच्या वसाहतीवर मोठ्या प्रमाणात आक्रमण केलं तर ऑस्ट्रेलियाला दरवर्षी किमान सात कोटी डॉलरचा फटका बसेल. हे प्राणघातक कीटक चारशेपेक्षा अधिक वेगवेगळ्या ठिकाणी पसरले आहेत. त्यांच्या संसर्गाला लगाम घालण्यासाठी ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत सुमारे एक कोटी मधमाश्यां नष्ट केल्या आहेत.’
पिकांनाही बसणार फटकामधमाशांना लॉकडाऊन केल्यामुळे ऑस्ट्रेलियात केवळ मधाच्या उत्पादनावरच परिणाम होणार नसून, इतर पिकांवरही त्याचा विपरित परिणाम होणार आहे. परागीकरणासाठी बदाम, ब्लू बेरी यासारख्या ज्या वनस्पती मधमाशांवर अवलंबून आहेत, त्या पिकांनाही याची मोठ्या प्रमाणात झळ बसणार आहे.