Japan Earthquake:जपानमध्ये नववर्षाची सुरुवात भीषण भूकंपाने झाली. देशात सोमवारी 90 मिनिटांत रिश्टर स्केलवर 4.0 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे 21 भूकंप जाणवले. एका भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.6 इतकी मोजली गेली.
भूकंपामुळे समुद्रात उंच लाटा उसळल्यानंतर देशाच्या उत्तर-पश्चिम किनारपट्टी भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांना सुरक्षित ठिकामी हलवण्यात येत आहे. जपानच्या हवामान खात्याने इशिकावा प्रांतातील नोटो शहरात मोठ्या सुनामीचा इशारा दिला आहे, ज्यामध्ये सुमारे 5 मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे.
भूकंपामुळे 34,000 घरांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. भूकंपामुळे रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्यामुळे अनेक प्रमुख महामार्गदेखील बंद करावे लागले. जपानच्या जवळ असलेल्या देशांच्या पश्चिम किनार्यावरील काही भागांना त्सुनामीचा धोका असून स्थानिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. दक्षिण कोरियाच्या हवामानशास्त्र एजन्सीने सोमवारी सांगितले की, जपानच्या भूकंपानंतर पूर्व किनारपट्टीवरील गँगवॉन प्रांतातील काही भागात समुद्राची पातळी वाढू शकते.
जपानमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. कोणत्याही मदतीसाठी, भारतीय नागरिक खालील आपत्कालीन क्रमांक आणि ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. दरम्यान, जपान सरकारने इशिकाव येथील हायस्पीड रेल्वे सेवा बंद केली आहे. दूरसंचार ऑपरेटर्सनी इशिकावा आणि निगाता येथे फोन आणि इंटरनेट सेवा खंडित झाल्याची माहिती दिली. राजधानी टोकियोमधील इमारतींनाही भूकंपाचा धक्का बसला आहे.
जपान एअरलाइन्सने पुढील सूचना मिळेपर्यंत निगाटा आणि इशिकावा भागातील बहुतेक उड्डाणे रद्द केली आहेत. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही त्सुनामी अपेक्षेपेक्षा जास्त प्राणघातक असू शकते, अशा परिस्थितीत लोकांनी पुढील आदेश मिळेपर्यंत सुरक्षित ठिकाणे सोडू नयेत.
दरम्यान, "रिंग ऑफ फायर" वर स्थित जपान जगातील सर्वात भूकंपग्रस्त देशांपैकी एक आहे. 11 मार्च, 2011 रोजी, जपानच्या ईशान्य किनारपट्टीवर 9.0 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे त्सुनामी आली आणि 18,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.