ओमान (Oman) येथील अल-मुघसाईल बीचवर तब्बल 8 जण समुद्रात वाहून गेल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. येथे सेफ्टी बॅरिअर पार करून काही लोक समुद्राच्या काठावर एन्जॉय करत होते आणि सेल्फी घेत होते. याच वेळी आलेल्या एका मोठ्या लाटेत हे 8 जण वाहून गेले. यावेळी एकच गोंधळ उडाला होता. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तेथे उपस्थित असलेले लोक, काही लोकांना वाचवतांनाही दिसत आहेत.
या दुर्घटनेतून वाचवण्यात आलेल्या तीन लोकांना पॅरामेडिक्सने आवश्यक प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. तर समुद्रात वाहून गेलेले काही लोक अद्यापही बेपत्ता आहेत. ओमान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाटेत वाहून गेलेले लोक आशियाई कुटुंबातील होते. तर काही जण, हे लोक भारतीय कुटुंबातील असल्याचे सांगत आहेत. मात्र, अद्याप वाहून गेलेल्या लोकांची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.
समुद्रात वाहून गेलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी काल उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. यासंदर्भात रॉयल ओमान पोलिसांनी ट्विट करून माहिती दिली होती. तसे ऑपरेशन संदर्भातील काही फोटोही शेअर केले होते.
यासंदर्भात रॉयल ओमान पोलिसांनी काल एक निवेदनही जारी केले होते. यात, बेपत्ता असलेल्या आशियाई कुटुंबातील सदस्यांचा शोध सुरू आहे. अल मुघसाइल भागात या लोकांचा शोध घेतला जात आहे. हे लोक बिचवरील सेफ्टी फेंस पार करून खडकांजवळ पोहोचले होते. याच वेळी लाटा आल्या आणि त्यांना वाहून घेऊन गेल्या, असे म्हणण्यात आले आहे.