ऑनलाइन लोकमत
मेक्सिको, दि. 1 - जगातील सर्वात लठ्ठ पुरुष असलेल्या 595 किलोंच्या जुआन पेड्रो फ्रान्कोवर लवकरच बायपास शस्त्रक्रिया केली जाणार आहे. मेक्सिकोमधील रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडणार असून यासाठी 9 मे ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. जुआन मॅक्सिकोच्या आग्वास्कालियांटेसचा रहिवाशी आहे.
जिन्हुआ न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार जुआनवर शस्त्रक्रिया करण्याआधी त्याचं वजन घटवणं जास्त महत्वाचं आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले असून जुआन सध्या तीन महिन्यांच्या डायटवर आहे. वजन घटवण्यासाठी विशेष आहाराचं नियोजन करण्यात आलं आहे. शस्त्रक्रिया करण्याआधी जुआनला आपलं वजन कमीत कमी 175 किलो घटवावं लागणार आहे. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करणं योग्य ठरणार आहे.
जुआनवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर जोस एंटोनिया कास्टेनेडा क्रूज यांनी दिलेल्या माहितीनुसार, "जुआननं आतापर्यंत 30 टक्के वजन कमी झालं असून आता त्याच्यावर बॅरिएट्रिक सर्जरी करणं शक्य आहे. या शस्त्रक्रियेनंतर जुआनचं तब्बल 50 टक्के वजन घटणार आहे. यानंतर गरज भासल्यास वजन घटवण्यासाठी त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येईल".
नोव्हेंबरमध्ये जुआन चर्चेत आला होता जेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी विशेष गाडीने आणण्यात आलं होतं. "त्यावेळी जुआनची शारिरीक स्थिती तसंच डायबेटिस या गोष्टींमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणं शक्य नव्हतं", असं डॉक्टर कास्टेनेडा यांनी सांगितलं आहे.
जुआन गेल्या सहा वर्षांपासून फक्त एकाच ठिकाणी बसून आहे. घऱातील बेड सोडून इतर ठिकाणी वावरणं त्याला शक्यच नाही. एका ऑनलाइन जाहिरातीच्या माध्यमातून त्याला या ऑपरेशनची माहिती मिळाल्यानंतर त्याने डॉक्टर जोस एंटोनिया कास्टेनेडा क्रूज यांच्याशी संपर्क साधला. वजन कमी केल्याने जुआनला काही त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र डॉक्टर जोस एंटोनिया कास्टेनेडा क्रूज सकारात्मक असून त्यांना आपण योग्य मार्गावर असल्याचा विश्वास आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना जुआनने आपल्याप्रमाणे लठ्ठपणाचा सामना करत घरात अडकून पडलेल्यांबद्दल भावना व्यक्त केल्या. "काहीजण दुखात होते, तर काहींनी मदत मागण्याची हिंमत दाखवली नाही आणि अशातच त्यांचा मृत्यू झाला. लठ्ठपणाचा सामना करत असाल तर आवाज द्या आणि मदत मागा. कारण ते शक्य आहे", असं जुआन बोलला आहे.