नवी दिल्ली : मानवापेक्षा प्राणीच बऱ्याचदा जास्त समजूतदार असतात. त्यांच्याकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकता येतील. नुकतेच एका हत्तीच्या पिल्लाने माणसाला नदीच्या पाण्यात वाहताना पाहून काशाचीही पर्वा न करता वाचवायचा प्रयत्न केला. या पिल्लाला वाटले की, हा माणूस बुडतोय म्हणून त्या पिल्लाने थेट पाण्यात धाव घेतली. हा व्हिडीओ इंटरनेटवर कमालीचा व्हायरल होत असून सोशल मिडीयावर या समजूतदार पिल्लाची वाहवा होत आहे.
ट्विटर युजर स्टान्स ग्राऊंडेड यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ''या हत्तीच्या पिल्लाने विचार केला की हा मामूस बुडत आहे आणि त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. आम्ही खरेच त्यांच्यासाठी योग्य नाही आहोत.'' व्हिडीओनुसार एका नदीच्या काठी हत्तींचा कळप फिरत होता. तेव्हा अचानक एक माणूस त्या प्रवाही पाण्यामधून वाहून जाताना दिसतोय. खरेतर तो पोहण्याचा आनंद लुटत होता.
त्याला पोहताना पाहून कळपातील छोट्या हत्तीला वाटले की हा व्यक्ती वाहून जात आहे, यामुळे त्याला वाचविण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाचा, दगडांचा विचार न करता हा हत्ती वेगाने वाहत्या पाण्यात उतरला. हत्ती आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून पोहणाऱ्याने त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला या पिल्लाने पकडत किनाऱ्यावर बाजुला नेले. या व्यक्तीने हत्तीला आभारी असल्याचेही म्हटल्याचे ऐकायला मिळते.
इंटरनेटवर हा व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या हत्तीच्या पिल्लाला हुशार आणि भावनिक असल्याचे म्हणत कौतूक केले आहे.