ऑनलाइन लोकमत
सुलावेसी, दि. 30 - अजगरामध्ये माणसाला गिळण्याची क्षमता असते असे म्हटले जाते. इंडोनेशियातील सुलावेसी बेटावरील सालुबीरो गावामध्ये अजगराच्या या ताकतीचा प्रत्यय आला. सालुबीरो गावामध्ये अजगराने चक्क एक माणसाला गिळून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सालुबीरो गावातील एका तरुण शेतक-याचा मृतदेह अजगराच्या पोटातून बाहेर काढण्यात आला. अकबर (25) असे मृत शेतक-यांचे नाव आहे.
अकबर शेतावर पीक कापणीसाठी गेला होता. बराच वेळ झाल्यानंतरही तो परतला नाही म्हणून स्थानिक गावकरी आणि कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. गावकरी शोधत अकबरच्या शेताजवळ पोहोचले त्यावेळी तिथे त्यांना एक अजगर विचित्रपणे सरपटत असल्याचे दिसले. अजगराचे पोट फुगलेले होते, पुढे सरकरणेही त्याला जमत नव्हते.
अजगराच्या फुगलेल्या पोटावरुन अजगराने अकबरला गिळल्याचे गावकर-यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच हत्याराने अजगराचे पोट फाडले त्यात अकबरचा मृतदेह सापडला. या अजगराची लांबी 7 मीटर (23 फूट) होती. या भागात अजगराच्या हल्ल्यात झालेला हा एकमेव मृत्यू आहे असे जुनैदी या गावक-याने सांगितले. फिलीपाईन्स आणि इंडोनेशियामध्ये 20 फुट लांबीचे अजगर आढळतात.
अजगर भूक शमवण्यासाठी छोटया प्राण्यांना लक्ष्य करतात. अजगराने माणसांवर हल्ला केल्याच्या घटना फार दुर्मिळ आहेत. 2013 मध्ये बाली बेटावरील हॉटेलमध्ये तैनात असलेल्या एका सुरक्षारक्षकांचा अजगराच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.