पूल कोसळल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. तुम्हाला जर कोणी नवाकोरा पूल कोसळला असं सांगितलं तर सुरुवातीला तुमचा विश्वासच बसणार नाही, पण हो हे अगदी खरं आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता घडली आहे. पुलाच्या उद्घाटनाच्यादिवशीच नेमका नवीन पूल कोसळला. नेत्यांनी पुलावरील फित कापून त्याचं उद्घाटन करताच पुलाचे दोन तुकडे झाले.
पूल अचानक कोसळल्याची ही भयंकर दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका पुलावर काही लोक उभे आहेत. एक नेता पुलाचं उद्घाटन करत आहे. फित कापताच पूल तुटतो आणि पुलावरील नेत्यांसह सर्वच्या सर्व लोक पुलावरून खाली कोसळल्याचं पाहायला मिळत आहे. पूल कोसळल्यावर एकच गोंधळ उडाला. कांगोमध्ये हा प्रकार घडला.
डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोतील अधिकारी आणि नेता एका पादचारी पुलाचं उद्घाटन करत आहेत. जशी पुलावरील फित कापतात तसे पुलाचे दोन तुकडे झाले. पुलावरील सर्वच्या सर्व लोक खाली कोसळले. सुदैवाने कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. पुलाच्या मधोमध सर्वजण अडकले आहेत. एकेएक करून त्यांना पुलावरून बाजूला घेतलं जात आहे.
पूल कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी यासाठी भ्रष्टाचाराला जबाबदार ठरवलं आहे. तर एकाने अधिकारी पुलाचं ग्रँड ओपनिंग करण्यासाठी पोहोचले होते, पण पुलाचा वेगळाच प्लॅन होता असं म्हटलं आहे. तसेच तरुण हा भाग सोडून जात आहेत, हे यातून दिसून येतं. अयशस्वी नेतृत्वानंतर या दुर्घटनेनं आपलं जगात हसू केलं आहे असंही एकाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.