ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 14 - दुबईत नुकतीच स्वयंचलित एअर टॅक्सीची चाचणी करण्यात आल्याची माहिती वाहतूक प्रशासनाने दिली आहे. जुलै महिन्यापर्यंत हवेत उडणारी ही टॅक्सी लाँच करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे दुबईत गेल्यास हवेत टॅक्सी उडताना विमानासोबत दिसल्यास आश्चर्यचकित होऊ नका. 2030 पर्यंत दुबईतील वाहतुकीचा बहुतांश भार या एअर टॅक्सीवर टाकण्याचा मानस आहे.
टॅक्सी स्वयंचलित असल्याने ती उडवायची कशी हा प्रश्नच येत नाही. प्रवाशांना टॅक्सी उडण्याआधी आपलं पोहोचण्याचं ठिकाण गुगल मॅपवर निवडायचं आहे. त्यानंतर ही आपोआप सुरु होते, आणि 100 किलोमीटर प्रतीतासाच्या वेगानं तुम्हाला निश्चित स्थळी पोहचवते. या टॅक्सीमध्ये फक्त एकच व्यक्ती प्रवास करु शकते.
EHang 184 असं नाव असणारी ही टॅक्सी 100 किमी प्रतीतास वेगाने धावणार असून तब्बल एक हजार फूट उंचीवर उडणार आहे. या टॅक्सीला रिचार्ज करायची गरज असून फक्त दोन तासात तिचं चार्जिंग होतं. या टॅक्सीमुळं वेळेची, पैशाची बचत होईल शिवाय ट्रॅफिकमध्ये फसण्याचा त्रासही कमी होईल असं तज्ज्ञ सांगतात.