ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारकडून दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिझ सईद याच्यासह चार जणांना लाहोरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
दहशतवादी संघटना 'जमात-उद-दावा'च्यानुसार पंजाब सरकारच्या गृह खात्याने सईदच्या नजरबंदीचे आदेश जारी केले आणि लाहोर पोलिसांनी चौबुरजीमधील 'जमात-उद-दावा'च्या मुख्यालयात पोहोचून या आदेशाची अंमलबजावणी केली. नजरकैदे कारवाई झाल्यानंतर कोंडी झाल्यामुळे बिथरलेल्या हाफिज सईदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी केला. व्हिडीओद्वारे त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तीव्र शाब्दिक हल्ला चढवला.
नजरकैदेची कारवाई होण्याबाबत सईदने भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरत म्हटले आहे की, 'भारताच्या दबावामुळेच पाकिस्तान सरकारकडून नजरकैदत ठेवण्यात आले आहे. अमेरिकेचे आताचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोदींसोबत चांगली मैत्री करायची आहे, म्हणूनच 'जमात-उद-दावा'वर दबाव टाकण्यात येत आहे.
विशेष म्हणजे 'अमेरिकेसोबत आपले कोणत्या प्रकारचे भांडण नसून काश्मीर मुद्यावरुन भारतासोबतच वाद आहे', असेही हाफिजने व्हिडीओमध्ये म्हटले आहे. शिवाय, जमात-उद-दावापासून पाकिस्तानातही कोणतीही समस्या नाही. उलट जमात-उद-दावा पाकिस्तानातील लोकांची सुरक्षा करत आहे, त्यांच्यासाठी बलिदान देत आहे, अशा उलट्या बोंबाही त्याने यावेळी ठोकल्या आहे.
#BREAKING: Terrorist Hafiz Saeed releases video after he was put in house arrest, claims Modi-Trump friendship led to action against him. pic.twitter.com/V5qYI4FTWC— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) 30 January 2017