ऑनलाइन लोकमत
ऑकलंड, दि. 8 - रेल्वे रुळ ओलांडू नका असे वारंवार आवाहन करुनही काहीजण वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडण्याचा धोकादायक पर्याय निवडतात. रेल्वे रुळ ओलांडताना निदान सतर्क असले पाहिजे पण काहीजण त्यावेळीही आपल्या तंद्रीमध्ये चालत असतात. ज्यामुळे एखादा अपघात घडतो. भारतातच नव्हे जगातल्या अनेक प्रगत देशात रेल्वे क्रॉसिंगवर होणा-या अपघातात नागरीकांचा मृत्यू होतो.
न्यूझीलंडमधला असाच एक रेल्वे क्रॉसिंगवरचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटा उभा राहतो. एका क्षणाचा विलंब झाला असता तर, ही महिला ट्रेनखाली गेली असती. न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरातील माऊंट एडन स्थानकातील हा व्हिडीओ आहे.
ट्रेन येत असल्याचा सिग्नल मिळाल्यानंतरही काही जण दुर्लक्ष करुन रेल्वे रुळ ओलांडतात. न्यूझीलंडमध्येही सिग्नल मिळाल्यानंतरच काही जण क्रॉसिंग करत होते. या दरम्यान गुलाबी रंगाचा जॅकेट परिधान केलेली एक महिला रुळ ओलांडत होती. ट्रेन तिच्या दिशेने येत असताना ती उजव्या दिशेला बघत होती.
तिने जेव्हा पाहिले तेव्हा ट्रेन तिच्या अगदी जवळ पोहोचली होती. एक क्षणाचा विलंब झाला असता किंवा आणखी एक पाऊल मागे असते तर, या महिलेच्या शरीराचे तुकडे झाले असते. नशीब बलवत्तर असल्याने ही महिला बचावली. ड्रायव्हरने लगेच इमर्जन्सी ब्रेक लावल्यानंतर ट्रेन पुढे जाऊन थांबवली. शुक्रवारी सकाळ ही घटना घडली. ही थरारक घटना सीसीटीव्ही कैद झाली असून हा व्हिडीओ युटयूबवर अपलोड झाला आहे. न्यूझीलंडमध्ये मागच्या 10 वर्षात रेल्वे रुळ, बोगदा आणि ब्रिजवर झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 100 जणांचा मृत्यू झाला आहे.