इस्रायल-हमास युद्ध सुरू होऊन 17 दिवस झाले आहेत. ना इस्रायल हमासवरील हवाई हल्ले थांबवायला तयार आहे ना हमास इस्रायली शहरांवर रॉकेट डागणं थांबवत आहे. याच दरम्यान, एक नवीन व्हिडीओ समोर आला असून त्यानंतर युद्ध सुरू झालं असं म्हटलं जात आहे. इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर रोजी नोवा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे. इस्रायलने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून हे शेअर केलं आहे.
7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलींवर कशाप्रकारे अत्याचार केले हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक रस्ता दिसत आहे, ज्यामध्ये गाड्या अशा प्रकारे पार्क केल्या आहेत की संपूर्ण रस्ता ब्लॉक झाला आहे. या अडवलेल्या रस्त्यावर हमासचे दहशतवादी जीपमधून येतात आणि वेगाने गोळीबार करू लागतात. दहशतवादी तिथे उभ्या असलेल्या गाड्यांवर चढतात आणि लोकांना लक्ष्य करतात. यानंतर दहशतवाद्यांनी तेथे उभ्या असलेल्या गाड्याही पेटवून दिल्या.
या व्हिडिओसोबत इस्रायलने कॅप्शनही लिहिलं आहे. इस्रायलने लिहिलं आहे की, हा व्हिडीओ हमासच्या नोवा फेस्टिव्हलवर झालेल्या हल्ल्याचा आहे, ज्यामध्ये 260 हून अधिक लोक मारले गेले होते. लोक तिथून पळून जाऊ नयेत म्हणून दहशतवाद्यांनी रस्ते अडवले. यानंतर त्यांनी कारमधील लोकांवर गोळ्या झाडल्या आणि गाड्या पेटवून दिल्या. कारमधून उतरून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही गोळ्या घातल्या गेल्या.
इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे 6,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. यापैकी 4,600 हून अधिक लोक गाझा आणि 1,400 हून अधिक लोक इस्रायलमधील आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून गाझामध्ये 14,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससारखे देश इस्रायलच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत, तर पॅलेस्टाईनला इराण आणि रशियासारख्या देशांचा पाठिंबा मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.