ऑनलाइन लोकमत -
बीजिंग, दि. 25 - प्राणीसंग्रहालयात वाघाने पर्यटक महिलेला ओढत नेऊन ठार केल्याची धक्कादायक घटना चीनमध्ये घडली आहे. प्राणीसंग्रहालयात फिरण्यासाठी आलेली महिला गाडीतून खाली उतरल्यानंतर काही कळण्याच्या आत वाघाने अचानक मागून येऊन तिच्यावर हल्ला करत तिला फरफटत नेलं आणि ठार केलं. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मैत्रीणीशी वाद झाल्याने महिला गाडीतून उतरली होती अशी माहिती चीनच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
बीजिंगमधील बडलिंग प्राणी संग्रहालयात ही घटना घडली आहे. महिला प्राणीसंग्रहालयात फिरायला आली होती. या प्राणीसंग्रहालयात पर्यटकांना आपली खासगी गाडी घेऊन जाण्यास परवानगी आहे. प्राणीसंग्रहालयात प्राणी मुक्त फिरत असल्याने पर्यटकांना गाडीतून उतरण्यास मात्र मनाई आहे. असं असतानाही ही महिला गाडीतून उतरली असल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसतं आहे.
गाडीतून उतरल्यानंतर महिला ड्रायव्हरच्या दिशेने चालत गेली. त्याच्याशी बोलत असतानाच मागून भला मोठा वाघ आला. महिलेला स्वत:ला वाचवण्याची काहीच संधी मिळाली नाही. वाघ महिलेला ओढत घेऊन गेला आणि अजून एका वाघाच्या सहाय्याने महिलेला ठार केलं. ड्रायव्हर आणि सोबत असणा-या महिलेने उतरुन वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच फायदा नव्हता. प्राणीसंग्रहालयातील कर्मचा-यांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
या हल्ल्यात महिलेला वाचवताना ड्रायव्हर आणि सोबत असलेली दुसरी महिला जखमी झाले आहेत. गाडीत एक लहान मुलही होतं जे सुरक्षित आहे. तपासासाठी प्राणी संग्रहालय काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे. द ग्रेट वॉल ऑफ चायनाला लागून असलेलं बडलिंग प्राणी संग्रहालय हे चीनमधलं सर्वात मोठं संग्रहालय आहे.