ऑनलाइन लोकमत
केप टाऊन, दि. 2 - हत्ती एक असा प्राणी आहे जो नेहमी कळपात असतो, आणि त्यांचं एकमेकांशी खूप चांगलं जुळतंही. पण आपल्या रस्त्यात येणा-या एका पिल्लाला हत्ती उचलून बाजूला फेकून देत असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. दिड मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये या पिल्लाला हत्ती वारंवार उचलून भिरकावून देत असल्याचं दिसत आहे. दक्षिण अफ्रिकेतील अॅड्डो एलिफंट नॅशनल पार्कमध्ये हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार मेटिंगदरम्यान पिल्लू अडथळा आणत असल्याने वैतागलेला हत्ती त्याला सारखं बाजूला ढकलत होता.
या व्हिडीओत हत्ती तीन वेळा पिल्लाला उचलून भिरकावत असल्याचं दिसत आहे. सुदैवाने इतक्या वेळा उचलून आपटल्यानंतरही पिल्लू जखमी झालं नाही. पण हा हत्ती सारखं असं का करतोय हा प्रश्न मात्र त्याला पडला असावा.
सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून फेसबूकवर सात हजारापेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून वाईट वाटत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी हत्तीने असं केल्याचं पहिल्यांदाच पाहत असल्याचं म्हटलं आहे. जेनी स्मिथीज आणि ल्योड कार्टर यांनी हा व्हिडीओ शूट केला आहे.