Japan Rocket Explodes: जपानी कंपनी स्पेस वनचे अत्यंत महत्त्वाचे रॉकेट प्रक्षेपण बुधवारी सकाळी अयशस्वी झाले. या मिशनच्या अपयशानंतर संपूर्ण टीममध्ये नाराजी पसरली. या प्रकल्पाचे संचालक आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या देखरेखीखाली एक पथक आता या प्रकल्पाच्या अयशस्वी प्रक्षेपणाबाबत सखोल चौकशी करत आहे. अंतराळ क्षेत्रातील तज्ज्ञांनाही आश्चर्य वाटले की, रॉकेट अंतराळात जाऊन दीर्घकाळ प्रवास करू शकेल याची कंपनीला खात्री होती, पण तरीदेखील अवकाशातील प्रक्षेपणानंतर अवघ्या काही सेकंदात कैरोस रॉकेटचा स्फोट कसा झाला? असा सवाल केला जात आहे.
या रॉकेटचा स्फोटजपानच्या खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक अवकाश प्रकल्पांना मोठा धक्का आहे. कारण या प्रक्षेपणाच्या माध्यमातून उपग्रह कक्षेत ठेवण्याचा जपानी खाजगी क्षेत्राचा हा पहिलाच प्रयत्न होता. ते पश्चिम जपानमधील वाकायामा प्रांतातील प्रक्षेपण साइटवर स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:00 वाजता (7:30 IST) नंतर क्रॅश झाले. या 18 मीटर लांब रॉकेटला 4 टप्प्यात घन इंधन वापरून प्रवास सुरू करायचा होता. मात्र काउंटडाउन संपताच अनपेक्षितपणे धूर आणि आगीचे लोट दिसून आले आणि रॉकेट फुटले.
स्पेस वन कंपनीची प्रतिक्रिया
निक्केई एशियाच्या अहवालानुसार, स्पेस वनने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी रॉकेट प्रक्षेपण जाणूनबुजून बंद केले होते. कंपनीच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, लॉन्चिंगदरम्यान अचानक हा निर्णय घ्यावा लागला. परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही तपास करत आहोत.
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार, कैरोस रॉकेट सुमारे 100 किलो वजनाचा छोटा सरकारी गुप्तचर पाळत ठेवणारा उपग्रह घेऊन जात होते. स्थानिक मीडिया या लॉन्चचे लाईव्ह स्ट्रीमिंग करत होते. अशा स्थितीत कंपनीला सोशल मीडियावर अनेक संमिश्र कमेंट्सला सामोरे जावे लागले.