चीन : एका गोठलेल्या नदीत अडकलेल्या वृध्द महिलेला एका इसमाने जीवाची पर्वा न करता वाचवल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. अनेक माध्यमांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो अल्पावधीतच व्हायरल झाला आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या हॅब प्रांतात एक महिला बर्फाच्या नदीत अडकली होती. तिला हालचालही करता येत नव्हती. त्यामुळे तिला तिथून बाहेर निघणं कठीण झालं होतं. दरम्यान तिथून ५४ वर्षाचे शी ली आपल्या बाईकने जात होते. त्यांनी त्या महिलेला पाहिलं. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता गोठलेल्या नदीत प्रवेश केला. बर्फात अडकल्या असल्या कारणाने त्यांना बाहेर काढण्यासाठी बर्फाला फोडण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या हातांनीच बर्फाला फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या महिलेला हळूहळू बाहेर काढण्यात आलं. शी ली यांच्यासोबत आणखी एक इसम होता. त्यांनीही तिला बाहेर काढण्यास मदत केली. पाहा व्हिडिओ -
बराच वेळ बर्फात राहिल्याने त्या पूर्ण थंड पडल्या होत्या. त्यामुळे ती आणखी काहीवेळ जरी याठिकाणी राहिली असती तर तिच्या जीवावर बेतलं असतं. त्यानंतर शी यांनीच त्या महिलेला सुखरूप घरी पोहोचवलं. दरम्यान, ती महिला नदीत नक्की कशी पडली याबाबतची माहिती अद्यापही समजलेली नाही. पण या प्रसंगामुळे माणसातली माणुसकी अद्यापही कायम आहे हेच जाणवतंय. सध्या चीनमध्ये हाडं गोठवणारी थंडी पडली असून तिथलं तापमान बरंच कमी झालंय. त्यामुळे तिथं पाणी गोठून बर्फ साचण्याचं प्रमाण वाढतंय. तिथली अनेक जलाशयं आणि नद्याही गोठल्या आहेत. म्हणूनच नदी परिसरातून प्रवास करताना सावधानतेचा इशार देण्यात आलाय.